मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ठाणे शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
प्रतिनिधी / माधवी रांजणे
ठाणे शहराचा सर्वांगीण विकास होत असून शहरातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत, मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले असून शहरातील सुशोभीकरण आणि स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. ठाणे शहरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ठाणे शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते त्यामुळे त्यांच्या विचारांना अंगिकारून सरकारची वाटचाल सुरू आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर अनेक बंद प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले आहेत. तर रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आजचा दिवस भाग्याचा असून भारतीय संगीत क्षेत्रातील सर्व युगांमध्ये ‘लता युग’ हे सर्वात अविस्मरणीय युग आहे. भारतीय संगीताचा अजरामर वारसा पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे लता मंगेशकर गुरुकुल उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
आज ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत असून जागोजागी झाडे लावणे गरजेचे बनले आहे. त्यासोबतच धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतला आहे हे सांगतानाच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.













