पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात शासन आपल्या दारी सोबतच दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान मोठया उत्साहात संपन्न होत आहेत. नुकतेच सातारा जिल्ह्यात दिव्यांग कल्याण दिव्यांगांच्या दारी अभियान पार पडले यामध्ये दिव्यांगांना एकाच ठिकाणी अनेक सुविधांचा लाभ देण्यात आला.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार,समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सातारा व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाअंतर्गत अभियाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक तसेच विधानसभा सदस्य मा. ना. श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या शुभहस्ते गरजू दिव्यांगाना मोफत तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले.
यावेळी मा.सपना घोळवे सातारा जिल्हा समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या ललिता शेळके, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक गौरव जाधव, अशोक सोळंके,शंकर फडतरे, ईश्वर चाळक आदि मान्यवर तसेच लाभार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात एकाच ठिकाणी दिव्यांगांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र, (UDID) आधारकार्ड, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, विविध दिव्यांग कल्याणकारी योजना, वित्तीय सहाय्य, सहाय्यक साधने आदी सुविधा देण्यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, आरोग्य विभाग,महसूल विभाग,समाजकल्याण विभाग, नगरपालिका , वित्तीय महामंडळे, बँका तसेच स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.













