Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

क्राईम न्यूज पोलीस डायरी

चांदकच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक

चांदकच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक
Ashok Ithape
  • PublishedAugust 8, 2023

जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागत आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप

भुईंज : चांदक, ता. वाई येथील दहावीतील विद्यार्थ्याला धमकी देवून खंडणी उकळत आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी भुईंज पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. सोन्या उर्फ साहिल संजय धुर्वे रा. सिद्धनाथवाडी, वाई आणि मयुर जाधव रा. शेंदूरजणे, ता. वाई अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की चांदकच्या सरपंच सौ. सोनाली कालिदास संकपाळ यांचा मुलगा अथर्व हा वाई येथील एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. शिक्षणासाठी तो वाई येथे जात असताना सोन्या उर्फ संजय धुर्वे आणि मयुर जाधव हे दोघे त्याला सुर्‍याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देवून पैसे मागत असत. तसेच पैसे न दिल्यास आई वडिलांनाही जीवे मारु अशी धमकी ते देत असत. दरम्यान घरातून पैसे गायब होण्याचेही प्रकार घडत होते. यावर अथर्वला विश्‍वासात घेवून विचारले असता त्याने सदरचा प्रकार त्याच्या मामाला फोनवर सांगितला होता. याच धमकीला कंटाळून त्याने आपल्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

अथर्वच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली होती. गुंड प्रवृत्तीचे युवक शालेय विद्यार्थ्यांना दमदाटी करत खंडणी गोळा करत असून अथर्व त्याचाच बळी ठरल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रक्षोभ व्यक्‍त होत होता.

याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर वाईचे पोलिस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भलचिम, भुईंजचे सपोनि रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी. आर. पवार यांनी आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. 2 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
दहशतखोर, खंडणीखोरांना जरब बसविण्याची मागणी
विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या वाईसह परिसरात गुंडगिरीने थैमान घातले आहे. दहशत माजवत खंडणी गोळ्या करणार्‍या टोळ्यांच्या एकेक कारनाम्यांनी सुसंस्कृत वाईचे नाव बदनाम झाले आहे. अथर्व संकपाळ सारखा दहावीत शिकणारा विद्यार्थी गुंड प्रवृत्तीच्या युवकांच्या दहशतीला बळी पडला असेल तर आपले पाल्य कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्‍न पालकांना पडला आहे. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक केली असली तरी असे प्रकार घडू नयेत यासाठी दहशतखोर, खंडणीखोरांना जरब बसविण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. खंडणीखोरांना जरब बसविण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!