Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

पर्यावरण

अहिरे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज क्लिन एनर्जीच्या सीबीजी प्रकल्पाचे उद्घाटन

अहिरे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज क्लिन एनर्जीच्या सीबीजी प्रकल्पाचे उद्घाटन
Ashok Ithape
  • PublishedMay 30, 2026

नेपियर गवत, प्रेसमड व कृषी अवशेषांपासून होणार पर्यायी इंधन निर्मिती; शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

खंडाळा, दि. ३० मे २०२६ : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे उभारण्यात आलेल्या राज क्लिन एनर्जीच्या नवीन कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले. पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती, प्रदूषण नियंत्रण आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी सीबीजी हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मोठी संधी असल्याचे नमूद केले. सीबीजी हे केवळ पर्यायी इंधन नसून शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन ठरू शकते. देशातील कचरा ही समस्या नसून मोठी आर्थिक संधी असल्याचे सांगत त्यांनी प्रेसमड, नेपियर गवत आणि कृषी अवशेषांपासून इंधन निर्मिती होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

अहिरे येथील या प्रकल्पामध्ये नेपियर गवत, कृषी अवशेष आणि साखर कारखान्यांमधून निर्माण होणाऱ्या प्रेसमडचा वापर करून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधन तयार केले जाणार आहे. त्यामुळे हरित ऊर्जा निर्मितीला चालना मिळण्याबरोबरच कृषी क्षेत्रालाही नवे आर्थिक बळ मिळणार आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी हा प्रकल्प प्रेरणादायी आणि रोजगारनिर्मितीसाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी राज क्लिन एनर्जीचे संचालक अनिल पिसे यांचे तसेच संपूर्ण राज समूहाचे मान्यवरांनी अभिनंदन केले.

या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, युवा नेते विराज शिंदे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छ, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात असून, सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यावरणीय विकासात त्याचे मोठे योगदान राहणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!