Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

कृषी वार्ता

सातारा जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी कृषी प्रक्रिया उद्योगांना बळ देणार : जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी कृषी प्रक्रिया उद्योगांना बळ देणार : जिल्हाधिकारी संतोष पाटील
Ashok Ithape
  • PublishedMay 30, 2026
  • कॉफी विथ कलेक्टर उपक्रमात कृषी उद्योजक व एफपीओंच्या अडीअडचणींवर सविस्तर चर्चा
  • विविध बेरी पिकांचा फलोत्पादन विकास कार्यक्रमात समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार

सातारा दि. २९ –  जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आणि सर्वंकष आर्थिक विकासासाठी कृषी व संलग्न क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘जिल्हा धोरणात्मक आराखड्या’चा  भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे ‘कॉफी विथ कलेक्टर’ या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी विभागांतर्गत आत्मा  व डिस्ट्रिक्ट स्ट्रेटॅजिक युनिट  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पांतर्गत कार्यरत शेतकरी उत्पादक कंपन्या , पीएमएफएमई  लाभार्थी, नवोदित कृषी उद्योजक आणि कृषी व कृषीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बैठकीच्या प्रारंभी ‘आत्मा’ सातारा येथील प्रकल्प संचालक अजय शेंडे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडून बैठकीचे उद्दिष्ट व महत्त्व उपस्थितांना सांगितले. या संवादात्मक बैठकीत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी शेती, फूड प्रोसेसिंग, कृषीपूरक व्यवसाय, मूल्यवर्धित कृषी उत्पादने आणि उत्पादनांची बाजारपेठ मिळवताना येणाऱ्या अडचणी मांडल्या.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या आल्याचा पीक विम्यात समावेश नसल्याने नैसर्गिक आपत्तीच्यावेळी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे निदर्शनास आणून दिले. उमेद, महालक्ष्मी सरस व इतर शासकीय प्रदर्शनांमध्ये केवळ बचत गटांनाच प्राधान्य दिले जाते. त्याऐवजी शासनाच्या विविध योजनांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व लघु उद्योजक, एफपीओ आणि उत्पादक संस्थांनाही हक्काचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी उत्पादकांकडून जिल्हा प्रशासनासमोर करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी चिया सीड, कोल्ड प्रेस्ड ऑइल, रोस्टेड सोयाबीन, सोया कुकीज, मखाना, नाचणी प्रक्रिया आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योजकता आणि मूल्यवर्धित उत्पादनांना शासनामार्फत सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगत त्यांनी कृषी विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले. जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी आणि ब्लूबेरी या विविध बेरी पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी त्यांचा ‘राज्य फलोत्पादन विकास कार्यक्रमात’ समावेश करण्याचा सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, “सातारा जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. उत्पादकांनी पारंपरिक विक्रीपद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. हिरव्या वाटाण्याप्रमाणेच फ्रोजन सोयाबीन, सोयाबीन आधारित खाद्यपदार्थ तसेच चायनीज व इतर खाद्यउद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.”  “कृषी उत्पादकांनी ब्रँडिंग, आकर्षक पॅकेजिंग, मार्केटिंग व निर्यातक्षम उत्पादनांवर भर देऊन बाजारपेठेच्या गरजेनुसार उत्पादन विकसित करावे. जिल्हा प्रशासन नवोदित कृषी उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,” असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीस कृषी विभागाचे अधिकारी, विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी उद्योजक, महिला बचत गट आणि कृषी क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!