Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

साहित्य

“नैतिकता ही शोपीस नसून आचरणाची गोष्ट” : तुकाराम मुंढे

“नैतिकता ही शोपीस नसून आचरणाची गोष्ट” : तुकाराम मुंढे
Ashok Ithape
  • PublishedMay 22, 2026

वाई वसंत व्याख्यानमालेच्या 110 व्या वर्षाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न 

वाई, दि. २१ मे : वाई वसंत व्याख्यानमालेच्या ११० व्या पुष्पाचा सांगता समारंभ लोकप्रिय प्रशासकीय अधिकारी श्री तुकाराम मुंढे (IAS) यांच्या “समाज आणि नैतिकता : आजची वास्तवता” या विषयावरील प्रभावी व्याख्यानाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चिंतामणी केळकर होते.

आपल्या भाषणात श्री तुकाराम मुंढे यांनी समाजातील ढासळती नैतिकता, वैयक्तिक जबाबदारी आणि सामाजिक जाणीव यांवर परखड भाष्य केले. “या व्याख्यानमालेत प्रा. शिवाजीराव भोसले यांच्यासारखे वक्ते होऊन गेले. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता; मात्र त्यांचे बंधू मुख्यमंत्री असल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी तो पुरस्कार नाकारला. याला नैतिकता म्हणतात. पण आज समाजात नैतिकतेची घसरण होताना दिसते. एखादा नैतिकतेने वागला तर लोक त्यालाच वेडा म्हणतात. आपण गेल्या महिनाभरात कधी स्वतःला विचारले आहे का की आपण जे करतो ते योग्य आहे की अयोग्य? ज्याने हा प्रश्न स्वतःला विचारला तोच खऱ्या अर्थाने जिवंत आहे. नैतिकता ही खुंटीला टांगण्याची वस्तू नाही,” असे ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी संत साहित्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदर्भ देत सांगितले, “तुकाराम महाराजांनी कायदेशीरदृष्ट्या योग्य असूनही नैतिकतेसाठी इंद्रायणी नदीत कर्जाची कागदपत्रे बुडवली. आज आपण नैतिकतेचा केवळ आव आणतो. अपघात झाल्यावर मदत करण्याऐवजी लोक व्हिडिओ काढतात. समाजाचा प्रवाह योग्य आहे की अयोग्य हे न पाहता आपण कचऱ्यासारखे वाहवत चाललो आहोत. माणूस म्हणून जगा, कचरा म्हणून नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवून सैन्यासाठी स्त्रियांविषयी आचारसंहिता तयार केली. ही खरी नैतिकता होती. हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व धर्म, स्त्री-पुरुष समान असलेले राज्य. पण आज ‘शिवाजी महाराज व्हावेत, पण दुसऱ्याच्या घरी’ अशी मानसिकता झाली आहे.”

त्यांनी पुढे समाजातील जबाबदारीबाबत भाष्य करताना म्हटले, “सगळेच एकमेकांकडे बोट दाखवत राहतात. सरकार, अधिकारी, जनता, कंत्राटदार ; प्रत्येक जण जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. पण ‘ही माझीच जबाबदारी आहे’ असा विचार झाला पाहिजे. ‘If I cannot, who else can?’ हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. प्रत्येकाने अशी भूमिका घेतली तर भारत महासत्ता होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. मी सोलापूर जिल्हाधिकारी असताना पंढरपूर मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. भक्त रांगेत उभे असताना देव झोपू शकत नाही असे मला वाटले. त्यावेळी विरोध झाला, पण प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे धैर्य आवश्यक असते.”

त्यांनी प्रशासनातील अनुभव सांगताना म्हटले, “मी कोणताही निर्णय घेताना स्वतःला तीन प्रश्न विचारतो ; तो कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, नैतिकदृष्ट्या योग्य आहे का आणि त्याचा फायदा सर्वांना होणार आहे का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर मी तो निर्णय घेतो. दोन महिन्यांपूर्वी माझी आई वारली. आम्ही कर्मकांड न करता तिच्या अस्थींवर झाड लावले. प्रत्येकाने असे केले तर पर्यावरणाचे अनेक प्रश्न सुटतील. प्रगती म्हणजे केवळ इमारतींची उंची नव्हे, तर नैतिकतेची उंची वाढणे होय. प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा माणूस मूर्ख नसतो; तो धैर्यवान असतो. मी आयएएसमधून निवृत्त होईल, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत डॉ केळकर यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय सौ. तनुजा इनामदार यांनी तर सत्कार अध्यक्ष डॉ चिंतामणी केळकर यांनी केला. केळकर यांचा सत्कार दत्ता मर्ढेकर यांनी केला. प्रायोजक मयुर व्होरा व अनिल देव यांचा सत्कार तुकाराम मुंढेचे हस्ते करण्यात आला. श्री आदित्य चौंडे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री भद्रेश भाटे यांनी आभार मानले.

व्याख्यानास वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने श्रोते महागणपती घाटावर उपस्थित राहिले. या समारोपाच्या व्याख्यानातून उपस्थितांना नैतिकतेचा पुनर्विचार करण्याची प्रेरणा मिळाली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!