विद्यार्थ्यांनी गुणवत्तेचा उच्चांक गाठून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला – भैय्यासाहेब जाधवराव
![]()
भुईंज विद्यालयाचा दहावीचा ९८.१३ टक्के निकाल; १७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण
भुईंज : रयत शिक्षण संस्था संचलित कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंज येथील इयत्ता दहावीचा माध्यमिक शालांत परीक्षा २०२६ चा निकाल ९८.१३ टक्के लागला असून विद्यालयाने गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत १७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले, तर ८० ते ९० टक्के दरम्यान ४२ आणि ७० ते ८० टक्के दरम्यान ५३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य मा. भैय्यासाहेब जाधवराव व प्राचार्य दिपक ढाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना भैय्यासाहेब जाधवराव यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्तेचा उच्चांक गाठून विद्यालयाचा नावलौकिक वाढवल्याचे सांगत सर्वांचे अभिनंदन केले.
भुईंज केंद्रात जयवर्धन महेश भोईटे याने ९८.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अनुज संतोष भोसले (९८.०० टक्के) द्वितीय, तर प्राची प्रकाश भोसले (९७.६० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच ओजस समीर भोसले, अक्षरा दौलत सूर्यवंशी, वेदिका राहुल दीक्षित, अनुष्का सुनील गायकवाड, वेदिका किशोर भोसले, स्नेहा सुरेश शिवथरे, वरद प्रवीण जोशी, तपस्या नितीन इथापे, साक्षी खंडेराव नांगरे, सार्थक गणेश उगले, अंजली प्रशांत बाबर, वेदांत देवानंद साळुंखे, साक्षी किरण काळभोर आणि सुयोग सुधीर थोरात यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले.
संस्कृत विषयात ९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविल्याबद्दल त्यांचा पालकांसह रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. तसेच मार्गदर्शक शिक्षक व वर्गशिक्षकांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
प्राचार्य दिपक ढाणे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कर्मवीर विद्या प्रबोधिनी व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यालयात अनिवासी गुरुकुल प्रकल्प राबविण्यात येतो. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय मार्गदर्शन, क्षेत्रभेट, सूक्ष्म गुणविश्लेषण आणि तज्ज्ञ मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित होत आहे. भविष्यातही विद्यालय शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य उत्तमराव भोसले व अशोकराव शिंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख स्वाती देसाई यांनी केले.
फोटो ओळी : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. श्री. भैय्यासाहेब जाधवराव, मा. प्राचार्य श्री दिपक ढाणे ,शिक्षक, पालक, विद्यार्थी





















