Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

अध्यात्म

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे जीवनचरित्र म्हणजे एक अभ्यास : आनंदराव पाटील

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे जीवनचरित्र म्हणजे एक अभ्यास : आनंदराव पाटील
Ashok Ithape
  • PublishedMay 20, 2026

ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात ‘ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले : एक आदर्श’ विषयावर व्याख्यान; मदनदादा भोसले यांची प्रमुख उपस्थिती

भुईंज : भुईंज नगरीचे दिवंगत सुपुत्र, राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांना शिस्त, लोकभावना जपण्याची शिकवण आणि वैचारिक ठेवा दिला असून त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे आजही अभ्यासाचा विषय आहे, असे प्रतिपादन माजी आमदार आनंदराव पाटील यांनी केले.

भुईंज येथे आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात कृष्णाकाठावरील ज्ञानसत्र व्याख्यानमालेत “ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले : एक आदर्श” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मदनदादा भोसले होते, तर ज्येष्ठ पत्रकार सतीश मोरे यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले, “आदरणीय प्रतापराव भाऊंनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर केवळ सातारा जिल्ह्याचेच नव्हे, तर महाराष्ट्र राज्याचे प्रभावी नेतृत्व केले. त्यांचे विचार, कार्यपद्धती आणि कर्तृत्व हे आजही एखाद्या विद्यापीठाप्रमाणे कार्यकर्त्यांना दिशा देणारे आहे. भाऊंनी घडवलेल्या कार्यकर्त्यांनी अनेक संघर्षांना समर्थपणे तोंड दिले. त्यांनी दिलेली संयमाची व संघर्षाची शिकवण आजही प्रेरणादायी आहे.”

भुईंजच्या सरपंच पदापासून सुरू झालेला प्रतापराव भोसले यांचा राजकीय प्रवास दिल्लीपर्यंत ठसा उमटवणारा ठरला असून, त्यांनी उभारलेला वैचारिक वारसा जपणे हे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार सतीश मोरे यांनी प्रतापराव भोसले यांच्या कार्यकर्तृत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत अनेक आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार मदनदादा भोसले यांनी ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत या उपक्रमाचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष पांडुरंग शेवते यांनी केले. प्रास्ताविक रामदास जाधव यांनी केले, तर आभार अशोकराव चव्हाण यांनी मानले. सूत्रसंचालन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी : भुईंज येथे आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार आनंदराव पाटील. समवेत माजी आमदार मदनदादा भोसले, ज्येष्ठ पत्रकार सतीश मोरे, चंद्रकांत इंगवले व रामदास जाधव.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!