भुईंज पोलिसांची मोठी कारवाई! ९.३५ लाखांचे ४३ गहाळ मोबाईल हस्तगत
![]()
सीईआयआर पोर्टलच्या मदतीने राज्याबाहेरूनही मोबाईल शोध; नागरिकांना मोठा दिलासा
वाई l प्रतिनिधी : भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या शोधासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत भुईंज पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. तब्बल ९ लाख ३५ हजार रुपये किमतीचे एकूण ४३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भुईंज व पाचवड ही प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक येथे खरेदी-विक्रीसाठी येत असतात. यामुळे प्रवासादरम्यान तसेच गर्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार गहाळ मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी विशेष पथकाची स्थापना केली. या पथकाने सीईआयआर पोर्टल व तांत्रिक साधनांच्या मदतीने महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील मोबाईल धारकांशी संपर्क साधत सातत्याने पाठपुरावा केला.
या मोहिमेत एक आयफोन १६ प्रो मॅक्ससह अनेक महागडे स्मार्टफोन हस्तगत करण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात ६.७० लाख रुपये किमतीचे ३० मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरज शिंदे, तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
भविष्यातही गहाळ मोबाईल शोधण्याची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे.





















