Tue, Jul 21, 2026
स्थानिक बातम्या

“महिलांच्या सन्मानासाठी चांदवडीचा पुढाकार; ग्रामीण विकासाला मिळाली संवेदनशीलतेची नवी दिशा”

“महिलांच्या सन्मानासाठी चांदवडीचा पुढाकार; ग्रामीण विकासाला मिळाली संवेदनशीलतेची नवी दिशा”
Ashok Ithape
  • PublishedMay 7, 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचा अभिनव पुढाकार; महिला व बालकांच्या आरोग्य-सन्मानाला प्राधान्य

वाई : ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्याचा विचार करत चांदवडी ग्रामपंचायतीने उभारलेला स्तनपान कक्ष सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम गावाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जात असून, महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या या स्तनपान कक्षामुळे माता व बालकांना आवश्यक गोपनीयता आणि सुविधा मिळत असून, महिलांच्या आरोग्याबाबत गाव प्रशासनाची संवेदनशीलता अधोरेखित होत आहे. ग्रामीण भागात महिलांसाठी अशा प्रकारची सुविधा निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

या उपक्रमासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या पुढाकारातून ग्रामविकासाच्या नव्या संकल्पनांना चालना मिळत असून, गावात महिलाभिमुख सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.

विशेष म्हणजे, हा स्तनपान कक्ष केवळ एक सुविधा नसून महिलांच्या सन्मानाचा आणि सामाजिक जाणीवेचा संदेश देणारा उपक्रम ठरत आहे. जिल्हा परिषद व ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या योजनेचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, इतर ग्रामपंचायतींसाठीही चांदवडीचा हा आदर्श प्रेरणादायी मानला जात आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला, युवक, अधिकारी व ग्रामस्थांनी एकत्र येत केलेल्या प्रयत्नांचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!