वाईत १ मेपासून ११० वी वसंत व्याख्यानमाला; महागणपती घाटावर २१ दिवस ज्ञानाची मेजवानी
![]()
सम्राट फडणीस यांच्या ‘माध्यमांतर’ व्याख्यानाने होणार प्रारंभ; आयएएस तुकाराम मुंढे यांच्या समारोपपर व्याख्यानाने सांगता.
वाई, ता. २६ : येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे ११० वे ज्ञानसत्र १ मे ते २१ मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. गेली शंभर वर्षांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेल्या या व्याख्यानमालेची परंपरा यंदाही उत्साहात जपली जाणार असून, दररोज सायंकाळी साडेसहा वाजता महागणपती घाटावर विविध विषयांवरील मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
या व्याख्यानमालेची सुरुवात महाराष्ट्र दिनी (१ मे) सकाळ समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांच्या ‘माध्यमांतर’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. उद्घाटनावेळी सामूहिक महाराष्ट्र गीत गायन आणि शिवतांडव स्तोत्र पठणाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या व्याख्यानमालेत आहार, आरोग्य, इतिहास, अर्थव्यवस्था, समाज, पर्यावरण, संरक्षण, साहित्य अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांचे ‘आहार हेच औषध’, डॉ. मंगेश कश्यप यांचे ‘शाश्वत विकास’, अभिजित जोग यांचे ‘सध्याची युद्ध परिस्थिती आणि भारत’, डॉ. विरेंद्र ताटके यांचे ‘वैयक्तिक आर्थिक नियोजन’, निलेश ओक यांचे ‘रामायण-महाभारताचा वैज्ञानिक कालनिर्णय’ हे विषय विशेष ठरणार आहेत.
तसेच ज्येष्ठ हार्मोनियम वादक जयराम पोतदार ‘संगीत नाटकांचा मागोवा’ मांडणार असून, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या कार्याचा प्रवास मुलाखतीतून उलगडला जाणार आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. अभिजित तगारे, अश्विनी कुलकर्णी, विनोद बाबर, आदित्य चौंडे, श्रीराम जोशी, अजित मराठे, स्वागत थोरात, सतीश पाकणीकर, एअर मार्शल हेमंत भागवत, रंगनाथ नाईकडे यांसारखे मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय सायकलप्रेमी आनंद वांजपे यांच्या ‘व्यसनमुक्तीनंतरचे व्यसन’ या विषयावरील विशेष मुलाखतही आयोजित करण्यात आली आहे.
व्याख्यानमालेचा समारोप २१ मे रोजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या ‘समाज आणि नैतिकता : आजची वास्तवता’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.
या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर व कार्याध्यक्षा तनुजा इनामदार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाईकरांसह परिसरातील रसिक श्रोत्यांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.





















