Sat, Apr 11, 2026
क्राईम न्यूज

बळीराजाला दिलासा : १० शेतीपंप चोरी प्रकरणी टोळीचा पर्दाफाश

बळीराजाला दिलासा : १० शेतीपंप चोरी प्रकरणी टोळीचा पर्दाफाश
Ashok Ithape
  • PublishedApril 8, 2026

रहिमतपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ जण ताब्यात

रहिमतपूर : शेतीपंप चोरीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला दिलासा देणारी कामगिरी करत रहिमतपूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १० शेतीपंप (विद्युत मोटरी) व एक महिंद्रा पिकअप गाडी असा सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सौरभ राजेंद्र निकम (वय २५, रा. तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांचा सहभाग उघडकीस आला आहे.

तारगाव व नलावडेवाडी शिवारातील आरफळ डावा कालवा परिसरातून शेतकऱ्यांचे १० शेतीपंप एकाच रात्री चोरीला गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पिकांना पाणी देण्याच्या महत्त्वाच्या काळात ही घटना घडल्याने शेतकरी चिंतेत होते.

या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी तपासासाठी विशेष सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करण्यात आले. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींचा माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान चोरीस गेलेले सर्व शेतीपंप तात्काळ जप्त करून संबंधित शेतकऱ्यांना परत देण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जोतिराम भुजबळ करत आहेत.

रहिमतपूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून बळीराजाच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!