वाईत ‘नो रूल्स, नो कंट्रोल’! अतिक्रमणामुळे वाहतुकीचा कोंडमारा
![]()
पालिका–पोलीस प्रशासनाच्या चालढकल भूमिकेमुळे नागरिक संतप्त; अतिक्रमण हटाव मोहीम कधी?
वाई | प्रतिनिधी
वाई शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, बेसुमार अतिक्रमणामुळे रस्त्यांसह संपूर्ण शहराचा श्वासच गुदमरल्याची भावना वाईकर नागरिक व्यक्त करीत आहेत. वाई नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या उदासीन आणि चालढकल भूमिकेमुळे अतिक्रमणाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, शहरातील प्रमुख रस्ते व चौकांवर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
शहरातील रस्त्यांची अवस्था आधीच खड्ड्यांमुळे दयनीय असताना, त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चारचाकी व दुचाकी वाहनांचे बेकायदा पार्किंग, फळविक्रेते व दुकानदारांचे फुटपाथवरील अतिक्रमण यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. काही काळापूर्वी वाई पोलिसांकडून चौकाचौकात बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात होती; मात्र ती कारवाई आता पूर्णतः थंडावल्याने गाड्या कुठेही उभ्या केल्या जात आहेत.
पोलीस दलाच्या तुटवड्यामुळे वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असून, अल्पवयीन मुले बेधडकपणे दुचाकी व चारचाकी वाहने चालवत असल्याचे चित्र आहे. पोलिसांचा धाक उरलेला नसून, शहरात पोलीस केवळ नावापुरते असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पालिकेकडून स्वतंत्र पार्किंग व्यवस्थेचा अभाव हा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. गणपती घाटावर तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असली तरी, तेथेच मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत आहे. किसनवीर चौक, आमंत्रण चौक आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त केवळ औपचारिक असून, अनेकदा कर्मचारी मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात. गणपती आळी, रामडोह आळी यांसारख्या अरुंद गल्ल्यांमध्येही वाहने उभी राहत असल्याने स्थानिक रहिवाशांचे हाल होत आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांवर—किसनवीर चौक ते चित्रा टॉकीज, किसनवीर चौक ते जैन मंदिर, किसनवीर चौक ते सरकारी दवाखाना, बावधन नाका ते विराट नगर—या मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा फळविक्रेते, दुकानदार, जाहिरात फलक व दुचाकींची रांग लागलेली असून, वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. मालवाहू वाहनेही कुठेही उभी करून माल उतरवित असल्याने कोंडीत भर पडत आहे.
बांधकाम क्षेत्रातही नियम धाब्यावर बसवले जात असून, पार्किंगची जागा न सोडताच बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. याकडे पालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अनेक वेळा आढावा बैठकांचे आयोजन झाले; मात्र चर्चेपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नियोजन बैठका केवळ फार्स ठरत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधीही या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. एकंदरीत अतिक्रमण व पार्किंगच्या प्रश्नामुळे वाई शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, पुन्हा एकदा धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
एसटी बसस्थानकासमोरील रस्ता रुंदीकरण कुचकामी – वाई एसटी बसस्थानकासमोर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ता चौपदरी करण्यात आला; मात्र बसस्थानकासमोरील हॉटेल्स व दुकानदारांमुळे पर्यटक रस्त्यावरच वाहने उभी करून खरेदी करत असल्याने रुंदीकरणाचा उद्देशच फसला आहे. पाचगणी–महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांमुळे येथे नेहमीच कोंडी होत असून, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था व जागा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक बनले आहे.













