Sat, Apr 4, 2026
राजकीय बातमीपत्र

पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादीपर्व सुरू

पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादीपर्व सुरू
Ashok Ithape
  • PublishedJanuary 1, 2026

मंत्री. मकरंद पाटील यांचा जनसंपर्क, दिलीप बगाडेंचा चेहरा आणि संघटनात्मक ताकदीमुळे ऐतिहासिक विजय

पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यश मिळवले आहे. २००६ नंतर प्रथमच पाचगणीत नगराध्यक्षासह तब्बल १५ नगरसेवकांची स्पष्ट बहुमताची सत्ता काबीज केली आहे.ना.मकरंद पाटील यांचा प्रभावी जनसंपर्क नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीपभाऊ बगाडे यांचा सर्वसमावेशक चेहरा राजेंद्रशेठ राजपुरे यांचे दमदार नियोजन आणि शेखर कासुर्डे यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांचे प्रतिकूल परिस्थितीत केलेले नेतृत्व यामुळे राष्ट्रवादीला हा विजय मिळवता आला.

ना मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने घाटजाई शहर विकास आघाडी ची रीतसर नोंदणी केली असून नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांचा सर्वसामान्य सर्वसमावेशक चेहरा राष्ट्रवादीला यशस्वी करण्यात महत्वाचा ठरला.विरोधकांनी प्रचंड मोठ्या खेळया केल्या.मतविभागणीसह वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या. पाचगणी मश्वर मध्ये अत्यावश्यक असलेली सगळीच्या सगळी ‘आयुधे’ वारेमाप वापरली. 2 महिने प्रचंड मेहनत करून नियोजन केले. पण, नियतीने त्यांच्या चाली फोल ठरवल्या. घाटजाई देवीच्या मनातील उमेदवार विजयी झाला. राष्ट्रवादीचे पाचगणी शहर अध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नारायण बिरामणे,परवीन मेमन, प्रकाश गोळे, राजेंद्र पार्टे, अमित कांबळे, महेश खांडके यांच्यासारख्या जुन्या नव्या समर्थकांना बरोबर घेऊन नव्याने राष्ट्रवादी बांधली. समोर सौ.लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्यासारखे कसलेले नेतृत्व असताना नारायण बिरामणे यांनी टिकवलेली निष्ठा राष्ट्रवादीला बळ देणारी ठरली. २००६ पासून सातत्याने राष्ट्रवादीची पीछेहाट होत असताना या नवनेतृत्वाच्या सामूहिक प्रयत्नाने पक्षाला हे मोठे यश मिळाले आहे. २००६ पासून झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी नेहमीच या शहरात खालच्या स्थानावर राहत होती. २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी प्रथमच शहरात पहिल्या क्रमांकाची मते घेऊ शकली. पण, हे यश सौ.कऱ्हाडकर गटाने हलक्यात घेतले. इथेच त्यांची मोठी चूक झाली.

नगरपालिकेची मुदत संपल्यानंतर पाचगणीत प्रशासकराज आले. या काळात शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, सौ.परवीन मेमन या कायम लोकसंपर्क ठेऊन राहिल्या. कऱ्हाडकर गट मात्र आपल्याकडे पाचगणीत निवडून येण्यासाठी आवश्यक ‘आयुध’ आहेत आपण कधीही निवडून येऊ शकतो, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कुठलेही असले तरी आपण त्याला शेंदूर फासून देव बनवू शकतो या अविर्भावात राहिला. राजू शेठ राजपुरे शेखर कासुर्डे यांनी सौ.कऱ्हाडकर गटापसून दुरावलेल्या दिलीप बगाडे यांना कायम ‘चार्ज’ ठेवले. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काहीही पडले तरी दिलीप बगाडे हा आपला माणूस म्हणून बरोबर राहील याची दक्षता या दोघांनी घेतल्याने दिलीप भाऊनी स्वीकारलेला राष्ट्रवादीचा मार्ग मोठी प्रलोभने येऊनही नाकारली. त्यातच राष्ट्रवादीच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मातब्बर प्रभाग क्रमांक १ ब मधून राष्ट्रवादीच्या चढउतारात कायम साथ देणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष राजश्री अजय सणस यांनी तब्बल ७४ मतांनी विजय संपादित केला. २०११ मध्ये त्यांना निसटता पराभव राष्ट्रवादीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरल्याचे जानकार सांगतात.कोणताही मोठे पाठबळ नसताना त्यांनी मोठा विजय मिळवला आहे.त्यांच्या विजयाने राष्ट्रवादीला सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आपापसात समनव्य साधणारा चेहरा मिळाला आहे.राष्ट्रवादीची सदस्यसंख्या १५ वर नेण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.
प्रभाग क्रमांक २ अ मध्ये सुप्रिया महेश माने यांनी १७२ मतांनी मोठा विजय मिळवला.या लढतीत माने यांना नारायण बिरामणे यांच्या परफेक्ट नियोजनाची उत्तम साथ लाभली.प्रभाग २ ब मध्ये माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामने यांना हरीश गोळे यांनी तगडे आव्हान दिले होते मात्र आपल्या अनुभवाच्या जोरावर नरेंद्र बिरामणे यांनी गोळे यांचा १६१ मतांनी दणदणीत पराभव केला.ही लढत जिंकण्यात नारायण शेठ यांच्या प्लॅनिंग चा मोठा वाटा आहे.नारायण शेठ यांनी मागील कार्यकाळात पक्षनिष्ठा टिकवल्यानेच राष्ट्रवादी सत्तेची चव चाखु शकली.

प्रभाग ३ मध्ये आकाश सुनील बगाडे हे ‘जाईन्ट किलर’ ठरले.युवा कार्यकर्त्यांची तगडी फौज या फुटबॉलपटू च्या विजयात मोलाची ठरली.या युवा नगरसेवकाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. प्रभाग तीन ब मध्ये गजानन भिलारे विशेषतः हरीश भिलारे यांच्या परफेकट प्लॅनिंग ने विमल गजानन भिलारे यांचा 190 मतांनी विजय झाला.अमेय भिलारे या युवा नेत्याने अगदीच अचानकपणे आपल्या आईची उमेदवारी जाहीर केली अन हा अनपेक्षित विजय साध्य केला.

प्रभाग ४ अ मध्ये पाचगणी सारख्या ‘कॉस्मोपिलिटीन’ शहराला न शोभणारा विखारी प्रचार करण्यात आला.परंतु आपल्या ‘बंद मुठ्ठी’ने लोकांच्या अडीअडचणीत धावून येणाऱ्या माजी नगराध्यक्ष मेमन परवीन फिरोज यांची लोकांनी साथ दिली.तर प्रभाग चार ब मध्ये नगराध्यक्ष शेखर दाजीनामा कासुर्डे यांच्या पराभवासाठी देव पाण्यात ठेवलेल्या विरोधकांनी तब्बल 148 मतांनी धूळ चारली. या प्रभागात अत्यंत वाईट प्रकारचा प्रचार झाला.शेखर कासुरडे पडनारच अशा पैजा लागल्या।पण शेखर दादांनी आपणच या नगरीचे बेताज बादशहा असल्याचे दाखवून दिले

प्रभाग ६ मध्ये माधुरी अजित कासुर्डे या 32 मतांनी विजय ठरल्या. त्यांच्या पाठीशी पती अजित कासुर्डे यांचे नेटवर्क आणि मिलींद दादा कासुर्डे याचे प्लॅनिंग उपयुक्त ठरले.

प्रभाग ७ ब मध्ये माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक प्रवीण गजानन बोधे यांना तायघाटच्या राजेंद्र वसंत पारठे या युवा नेत्याने मोठे आव्हान दिले होते ही लढत अटीतटीची होईल असे वाटत असतात होते परंतु यामध्ये राजेंद्र वसंत पारठे यांनी आपल्या भावकीच्या जोरावर प्रवीण बोधे यांचा 165 मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला. या लढतीत संजीवन स्कुलची ‘संजीवनी’ पण पार्टे यांच्या पाठीशी राहिली.

प्रभाग ८ अ मध्ये बहुरंगी लढत झाली यामध्ये नवख्या अमित अनिल कांबळे यांनी गतवेळच्या काही फरकाच्या मताने पराभूत विजय मिळवुन आपल्या आजोबा, माजी उपनगराध्यक्ष गंगाराम कांबळे, तसेच चुलती सौ रेखा सुनिल कांबळे च्या पावलावर पाऊल ठेऊन पालिकेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली जवळीक त्यांना उपयुक्त ठरली.

प्रभाग ९ अ मध्ये बहुरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या स्वाती गौतम कांबळे यांनी बाजी मारली. तरी याच गटातील ब कायम लोकसेवेत राहणाऱ्या रात्रंदिवस लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झगडणाऱ्या युवा नेते प्रकाश गेणदेव गोळे यांनी बाजी मारली. या युवा नेत्याच्या पराभवासाठी खूप मोठी ‘रसद’ पोहच करूनही प्रकाश गोळे यांनी बाजी मारलीच.

प्रभाग १० अ मध्ये अनेक वर्षे लोकांच्या आणि मित्रांच्या गराड्यात राहणाऱ्या महेश खांडके ‘सायलेंट किलर’ ठरले, चौरंगी लढती महेश खांडके हे ७४ मतांनी विजयी झाले. तर ब मध्ये सौ.अमृता प्रकाश गोळे यांनी उच्चांकी ३६५ मतांनी विजयी झाल्या. पती प्रकाश गोळे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल प्रभाग क्रमांक १० ने घेतली. हा विजय प्रकाश गोळे याच्या समाजसेवेची पोहोचपावती आहे.

  • आ. मकरंद आबा पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांचे मार्गदर्शन आणि साथीने आपण यशस्वी ठरलो असून यापुढे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन आम्ही पाचगणीच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आता स्वच्छ सुन्दर पाचगणी ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.घाटजाई शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पाचगणी शहर विकासाचे स्वप्न पूर्ण करू. – दिलीप बगाडे लोकनियुक्त नगराध्यक्ष पाचगणी

  • ‘कुठं नेऊन ठेवली पाचगणी आमची’ अस म्हणणाऱ्याच्या खोट्या,आभासी सत्ताधाऱ्यांना पाचगणी शहराने सत्तेतून हद्दपार केले आहे. हा विजय सत्याची कास धरणाऱ्या प्रत्येक पाचगणीकरांचा असून यापुढे नुसता ‘मॅनेज’ विकास न करता पाचगणी विकासाची ‘व्हिजन’ घेऊन आम्ही काम करणार आहोत.नागरिकाच्या विश्वासास पात्र राहून ना.मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पाचगणीत विकासाची गंगा आणू। – शेखर कासुर्डे, माजी नगराध्यक्ष पाचगणी

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!