छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील पहिल्या भव्य मंदिराचे सोमवारी लोकार्पण
![]()
भिवंडीवाडा लगतच्या मराडे पाडा येथे तिथीनुसार शिवजयंतीदिनी कार्यक्रम होणार संपन्न

वाई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हे युगपुरुष आणि सर्वांचेच दैवत. मोगलांशी टक्कर देत गड – किल्ल्यांच्या रूपाने विस्तारलेले राज्य आणि जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी साकारलेले स्वराज्य ही शिवछत्रपतींच्या पराक्रमाची निशाणी. म्हणूनच साडेतीनशे वर्षानंतरही त्यांच्या कर्तुत्वाचे पोवाडे ठिकठिकाणी गायले जातात. शिवराय म्हणजे जाणते राजे आणि शिवप्रभू म्हणजेच देवाचा अवतार, अशीच सर्वांची श्रद्धा आहे. त्यातूनच भिवंडी वाडा रस्त्यालगत मराठी पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा तिथीनुसार शिवजयंतीदिनी सोमवार, दि. 17 मार्च रोजी संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील या पहिल्याच भव्य दिव्य शिवमंदिराचे लोकार्पण होत आहे.

शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या मंदिरातील सहा फुटांची मूर्ती अखंड कृष्णशिलेतून घडवण्यात आली असून अयोध्येतील रामलल्ला मूर्तीची निर्मिती करणाऱ्या अरुण योगीराज यांच्या कल्पक आणि कलात्मक दृष्टिकोनातून ही मूर्ती साकारली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 17 व्या शतकात महाराष्ट्रात क्रांती घडवणारे महान योद्धा होत. आदिलशाही, निजामशाही, मोगली आक्रमण यांनी पिळवटून निघालेल्या महाराष्ट्रात “हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही तर श्रींची इच्छा” अशा तळमळीतून आऊसाहेब जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याचे तोरण बांधले. परकीयांबरोबरच प्रसंगी काही स्वकीयांचाही उपद्रव झाला, मात्र वाडी वस्तीवरील आणि गावा गावाचे समविचारी मावळ्यांची मोट बांधून त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला. प्रसंगी ग़निमि काव्याचे तंत्र ही अवलंबले. युद्धाच्या बरोबरीने काही वेळा तहाचा मार्गही स्वीकारला. मात्र पुन्हा नव्याने भरारी घेत स्वराज्यात अनेक गड किल्ल्यांचा समावेश केला.

माझी जनता सुखी व्हावी आणि हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन व्हावे, या तळमळीतून त्यांनी अनेक मोहिमा आखल्या. त्यांच्या कार्याचा झेंडा संपूर्ण जगभर पोहोचला. मात्र त्यांचा पराक्रम सर्वांनाच माहीत व्हावा व त्यांच्या असीम त्याग व अलौकिक कार्याचा वसा- वारसा पुढील कित्येक पिढ्यांनी अनुसरावा या उद्देशाने त्यांच्या कर्तुत्वाच्या गाथा अनेक इतिहासकार, लेखक, शाहीर कलाकार आदी घटकांनी गायल्या आहेत. मात्र मंदिराच्या रूपाने त्यांची प्रथमच स्मृती तेवत ठेवण्याचे काम शिवक्रांती प्रतिष्ठानने केले आहे. त्यातूनच राज्यातील शिवाजी महाराजांच्या पहिल्या भव्य मंदिराचे काम भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथे पूर्ण झाले आहे.
मराठी कालगणनेतील तिथीनुसार 17 मार्च रोजी शिवजयंती येत आहे. त्यादिवशी मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
शिवाजी महाराजांचे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, स्वामी गोविंदगिरी महाराज, काडसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंदिराचे लोकार्पण होणार आहे. ही मूर्ती अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती घडविणारे मूर्तीकार अरुण योगीराज या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुर्तीकाराने अखंड कृष्णशिला या दगडातून सहा फूट उंचीची बनवली आहे. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर शिल्प चित्र साकारण्यात आले आहे. त्याखाली त्या त्या प्रसंगाची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये देण्यात आली आहे. हे मंदिर शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार आहे. गेली सलग सात वर्षे सुरू असलेल्या काम पूर्णत्वास आले आहे. येथील सर्व वातावरण शिवमय झाले आहे. संपूर्ण तालुका, जिल्ह्याबरोबरच राज्यभर या मंदिराविषयी उत्सुकता आणि मोठी चर्चा सुरू झाली आहे.

शिवाजी राजांमुळेच हिंदूंची मंदिरे वाचली, त्या राजांचे एक मंदिर व्हावे अशी आमची भावना होती. ज्या राजांमुळे आपला हिंदुस्थान अखंड राहिला. आदिलशहा, निजामशहा यांची आक्रमणे होत असताना आपले राजे त्यांच्या विरोधात उभे ठाकले ते लढले नसते तर आज परिस्थिती वेगळी असती. त्यामुळे राजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हे मंदिर उभारले आहे, असे शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी सांगितले.
अरुण योगीराज यांनी घडवलेली ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिलीच मूर्ती आहे. चार वर्षांपूर्वी ती बनवण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मध्यंतरी अयोध्येतील मूर्तीच्या निर्मितीकामामुळे त्यामध्ये काहीसा खंड पडला होता. ही मूर्ती बनवताना अरुण योगीराज यांनी विविध पैलूंचा अभ्यास करून या मूर्तीमध्ये सजीवत्त्व आणले आहे.

विविध ३६ शिल्पचित्रांतून साकारला जीवनपट
शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शौर्याचे प्रसंग त्यांचा इतिहास समाजाला कळावा, यासाठी तटबंदी खालील जागेत 36 शिल्पचित्र बनवण्यात आली आहेत. या चित्रातील बारकावे साकारण्यात कलाकारांनी अक्षरशः जीव ओतला असल्याचे दिसून येते.













