Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

मी तर इथला मुखियाच ; मायभूमीत आल्याचे समाधान

मी तर इथला मुखियाच ; मायभूमीत आल्याचे समाधान
Ashok Ithape
  • PublishedJanuary 28, 2025

केंद्रीय मंत्री ना. ज्योतिरादित्य शिंदे यांचे कण्हेरखेडमध्ये प्रतिपादन

कोरेगाव / प्रतिनिधी : इतिहासकाळात आम्ही महाराष्ट्राबाहेर गेलो असलो तरी, या मातीशी आमची नाळ कायम जुळलेली आहे. मी पाहुणा नाही तर इथला मुखिया आहे. मायभूमीत आल्याचे समाधान वाटते, असे भावूक उद्गगार केंद्रीय दूरसंचार मंत्री ना. ज्योतिरादित्य शिंदे यांनी कण्हेरखेड, या. कोरेगाव येथे काढले.
आपल्या मूळगावी सोमवारी केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्राचे विकासमंत्री ना. जोतिरादित्य शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ना. शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ. प्रियदर्शनीराजे शिंदे, युवराज महाआर्यमानराजे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मनोजदादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

एक एक मावळा जमवून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सुरुवातीला अवघे २० किल्ले असताना पराक्रमाची शर्थ करीत आणि गनिमी कावा यांचा अवलंब करून अत्यंत कमी काळात ३६५ किल्ल्यांचे स्वराज्य विस्तारित करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या छत्रपती शिवरायांकडे होते. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून अनेक सरदारांनी अटकेपार घोडदौड केली, असे सांगून ना. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पानिपतच्या रणसंग्रामाला उजाळा दिला. यावेळी “हर हर महादेव…” अशी जोरदार घोषणा देत उपस्थितां मध्ये चैतन्य निर्माण केले. इथल्या वाड्याचा दगड आणि दगड आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत असल्याचे सांगून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य पुढे नेण्याचे काम अनेक सरदारांनी केले. त्यात शिंदे घराण्याचे योगदान बहुमोल असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. “बचेंगे तो और भी लढेंगे” या दत्ताजी शिंदे यांच्या रणसंग्रामावरील प्रसंगाची आठवण करून देत असतानाच दहा वर्षानंतर पानिपतच्या रणसंग्रामास तोडीस तोड उत्तर देऊन मोघलांना धडा शिकवण्याची धमक शिंदे परिवारातील दिग्गजांनी दाखवली, असल्याचेही आवर्जून सांगितले. तसेच अत्यंत कमी कालावधीत उत्तम कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थ व संयोजकांचेही कौतुक केले.

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या भाषणात ना. ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील ( कै.) माधवराव शिंदे, आजी (कै.) विजयाराजे शिंदे यांच्याशी आपले वडील (कै.) अभयसिंहराजे भोसले व आजी (कै.) सुमित्राराजे भोसले यांचे वैचारिक आणि भावनिक नाते होते, असे सांगून कण्हेरखेडच्या सुपुत्रांनी राज्याबाहेर गाजवलेला पराक्रम वंदनीय असल्याचे सांगितले. दरम्यान, कोणत्याही कार्यक्रमासाठी इतक्या संख्येने गावकरी जमत नाहीत. तुमचे या गावाशी असलेले ऋणानुबंध अखंड असल्यानेच मोठ्या जिव्हाळ्यातून हा जनसागर येथे जमला आहे. पराक्रमी सरदार घराण्यांची शिवछत्रपतींवर श्रद्धा तसेच स्वराज्यावर अपार निष्ठा असल्यामुळे शिवस्वराज्य अटकेपार पोहोचले, असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तसेच प्रा. डॉ. पी. एन. शिंदे लिखित महादजी शिंदे लिखित चरित्र ग्रंथाचेही पूजन करण्यात आले. शिंदेशाही पगडी, तलवार, शाल व पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण शिंदे परिवाराचे ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले. माजी सरपंच दुष्यंतराजे शिंदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आभार मानले तसेच ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व अन्य मान्यवरांच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रगती होत असतानाच ना. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ममत्वामुळे विकासकामांना आणखी गती प्राप्त होईल, असे प्रतिपादन केले. तसेच आगामी काळात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपदही त्यांनी भूषवावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच येथील पाणी प्रश्नासह विविध विकासकामे सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायतीसह विविध संस्था, संघटनांतर्फे ना. शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दूरसंचार खात्याचे केंद्रीय मंत्री असलेल्या ना. शिंदे यांनी स्थानिक टपाल कार्यालयासही सदिच्छा भेट दिली.

पत्रकार जयंत लंगडे, प्रा. वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.
आपल्या मायभूमीत आल्यावर ना. शिंदे यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर सवाद्य मिरवणूकीने ते कार्यक्रम स्थळी आले.

कार्यक्रमास सातारा जिल्हा नागरी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय भोसले, दुरसंचारचे रवींद्र क्षीरसागर, टपाल खात्याचे विलास घुले, लेखक व इतिहास संशोधक प्रा. पी. एन. शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ. दीपिका शिंदे, सरपंच सौ. सारिका संतोष शिंदे, उपसरपंच अजित पवार, मा. सरपंच दुष्यन्तराजे शिंदे, ऍड. विजयसिंह शिंदे, ऍड जयदीप शिंदे, चेअरमन केशव शिंदे, मा. सरपंच संभाजीराव शिंदे, मा.सरपंच संजय शिंदे, मा. चेअरमन दीपक शिंदे, दत्तात्रय भोसले, संतोष जाधव, सचिन शिंदे, अमर शिंदे, प्रकाश शिंदे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मायभूमीची माती कपाळी लावली

ना. ज्योतिरादित्य शिंदे, सौ. प्रियदर्शनी शिंदे व युवराज महाआर्यमानराजे यांनी कण्हेरखेड गावांमध्ये प्रवेश करताच गावच्या कमानीसमोर आपल्या मायभूमीच्या चरणी माथा टेकवला व कण्हेरखेडची माती आपल्या कपाळी लावली. आपल्या गावाविषयीची ही कृतज्ञता उपस्थितांना विशेष भावली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!