पाच लाखाच्या लाचप्रकरणी चक्क न्यायाधीशच जाळ्यात
![]()
साताऱ्यातील प्रकार ; जामीन देण्यासाठी मागितली होती लाच : न्यायपालिकेच्या विश्वासाला हादरा,
सातारा / प्रतिनिधी
संतोष पोळवरील सुनावणीही न्या. निकम यांच्याच दालनात
वाईतील साखळी खून प्रकरणातील आरोपी संतोष पोळ याच्यावरील खटल्याची सुनावणीही न्या. धनंजय निकम यांच्यासमोरच सुरू असून वाई येथील जिल्हा न्यायालयातील कामकाजाचा कार्यभारही त्यांच्याकडेच आहे. तसेच मांढरदेव येथील देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन पदाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.
न्यायपालिकेच्या विश्वासाला हादरा देणारी घटना सातारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. न्यायालय परिसरात न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या घटनेची आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुणे येथील एका तरुणीने याबाबत तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरात वस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. हा प्रकार दि. ३, ९ तसेच १० डिसेंबर रोजी घडला आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित क्रमांक एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले. तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करुन देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी म्हणून पाच लाख रुपयांची मागणी केली. जामीनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच १० डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासोबत अनोळखी व्यक्तीने ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांना ताब्यात घेतले.
वास्तविक आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात न्याय मागण्यासाठी सर्वसामान्य नागरिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावत असतो. अशावेळी पुणे आणि सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तपणे कारवाई करत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्यानंतर यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घटना घडामोडी घडत होत्या. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वांना रंगेहात पकडले. मात्र या सर्व घटनेमुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सर्वसामान्यांसाठी शेवटचे आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात तडा केला आहे. पोलिस यंत्रणेकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपल्याला दाद मिळेल, न्यायदानासाठी न्यायाधीशांच्या निस्पृह खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तीकडून आपल्यावर झालेला अन्याय दूर होईल, अशी सर्व सामान्य नागरिकांची भावना असते. मात्र, आता न्यायाधीश यांच्यावरच लाच घेतल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे आता विश्वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक पोलिस व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना पाच लाखाच्या लाच प्रकरणी न्यायाधीशांनाच पकडण्याची घटना म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार आहे.













