Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

सामाजिक

धावडीत पंचशील बौद्ध विहाराचे लोकार्पण; विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याची ना. मकरंद आबांची ग्वाही

धावडीत पंचशील बौद्ध विहाराचे लोकार्पण; विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याची ना. मकरंद आबांची ग्वाही
Ashok Ithape
  • PublishedMay 25, 2026

बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करणारे विहार उभारल्याचा आनंद; सुसज्ज अभ्यासिकेसाठीही निधी उपलब्ध करून देणार – ना. मकरंद पाटील

वाई : धावडी येथील भीमसेवा मंडळाने उभारलेल्या पंचशील बौद्ध विहाराच्या देखण्या वास्तूचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बौद्ध वस्तीतील विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

धावडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या या प्रसन्न विहारात भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होणार असल्याचे सांगत ना. मकरंद आबा पाटील म्हणाले, “आजवरच्या राजकीय वाटचालीत बौद्ध वस्तीतील नागरिकांनी मनापासून साथ दिली आहे. त्यामुळे येथील विकासकामांसाठी लागेल तेवढा निधी देण्यात येईल. तसेच नजिकच्या काळात येथे सुसज्ज अभ्यासिका उभारण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल.”

यावेळी वाई पंचायत समितीच्या उपसभापती वर्षाताई जगताप, ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, धावडीच्या सरपंच वनिता ननावरे, बाजार समितीचे माजी संचालक विजयकुमार मांढरे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गंगावणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुणआप्पा मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण जगभरात बुद्धांच्या शांततेच्या मार्गाचा स्वीकार केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अमूल्य अशी राज्यघटना दिली. या महापुरुषांच्या विचारांना चालना देणारे आकर्षक बुद्ध विहार धावडी येथे उभारण्यात आल्याने मनस्वी आनंद झाला असून विधायक कामांसाठी निधी देण्यास आपण कायम तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी म्हणाले, “छोट्याशा गावात कार्यकर्त्यांनी उभारलेली ही सुंदर बौद्ध विहाराची वास्तू प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांचा विचार समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य गेली अनेक वर्षे सुरू आहे.” बौद्ध विहाराच्या उभारणीसाठी मदत केल्याबद्दल त्यांनी ना. मकरंद आबा पाटील यांचे आभार मानले.

कार्यक्रमात विहाराच्या बांधकामासाठी धम्मदान देणाऱ्या माहेरवाशीण महिलांचा मंत्रीमहोदयांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

तानाजी खंडागळे यांनी प्रास्ताविक केले. रमेश खंडागळे, शरद गंगावणे, दिलीप खंडागळे, स्वप्नील खंडागळे, हिरालाल गंगावणे, मिलिंद खंडागळे, तेजस्विनी खंडागळे व वंदना गंगावणे यांनी स्वागत केले. अशोक येवले यांनी सूत्रसंचालन तर रूपेश खंडागळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास धावडी, पिराचीवाडी, गुंडेवाडी येथील ग्रामस्थांसह भीमसेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!