Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

महाराष्ट्र

“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल

“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल
Ashok Ithape
  • PublishedMay 17, 2026

मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष पटकारे यांनी महाराष्ट्र शासन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.

१५ मेपासून खारपाडा टोलनाका अचानक सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता टोल वसुली सुरू करण्यात आल्याचा आरोप पटकारे यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या व अपूर्ण अवस्थेतील मुंबई-गोवा महामार्गामुळे शेकडो अपघात झाले असून हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या ८४ किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण आजही पूर्ण झालेले नाही. २००९ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. सुरुवातीला ९२२ कोटी रुपयांचा असलेला प्रकल्प खर्च वेळेत काम पूर्ण न झाल्याने तब्बल १२०० कोटींवर पोहोचल्याचे पटकारे यांनी नमूद केले. निकृष्ट दर्जाचे काम व रखडलेले बांधकाम यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

खारघर टोलनाक्याप्रमाणे या टोलनाक्यावरही खाजगी वाहनांना संपूर्ण टोलमुक्ती देण्यात यावी, अशी मागणी करत समस्त कोकणवासीयांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची वेळ आल्याचे पटकारे यांनी म्हटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो प्रवासी दरवर्षी गोव्याकडे प्रवास करतात. त्यामुळे महाराष्ट्र शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून कोकणवासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी संतोष पटकारे यांनी केली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!