Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

महाराष्ट्र

रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्ता मानकांसाठी ‘बीव्हीजी’च्या सहकार्याने देशातील पहिलाच मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्ता मानकांसाठी ‘बीव्हीजी’च्या सहकार्याने देशातील पहिलाच मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न
Ashok Ithape
  • PublishedMay 16, 2026

सातारा , दि. १५ मे २०२६ : भारत सरकारच्या आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषद आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका सेवा मानांकन निकषांनुसार देशातील पहिलाच “मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम” पुण्यात यशस्वीरित्या संपन्न झाला. १३ ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण उपक्रमात देशभरातील तज्ज्ञ, प्रशिक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

देशभरातील रुग्णवाहिका सेवांची गुणवत्ता अधिक सक्षम, परिणामकारक आणि रुग्णकेंद्री करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून प्रशिक्षित आणि प्रमाणित मूल्यांकनकर्त्यांची फळी तयार करण्यात आली असून, हे मूल्यांकनकर्ते देशातील विविध रुग्णवाहिका सेवांचे परीक्षण करून उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुख्य अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. प्रसाद राजहंस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपत्कालीन आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता, रुग्ण सुरक्षितता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्त्व अधोरेखित करत अशा संरचित प्रशिक्षण कार्यक्रमांची गरज स्पष्ट केली. प्रशिक्षित मूल्यांकनकर्त्यांमुळे रुग्णवाहिका सेवांचा दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भारत सरकारच्या हेल्थ सेक्टर स्किल कौन्सिल (HSSC) रुग्णवाहिका सेवा प्रदाता मानांकन निकष समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये व्यवहार्य, संवेदनशील आणि परिस्थितीनुरूप मूल्यांकन प्रणालीची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. गुणवत्ता हमी, सातत्यपूर्ण सुधारणा आणि कार्यक्षम प्रतिसाद व्यवस्थेसाठी प्रशिक्षित मूल्यांकनकर्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन दिवसांच्या सत्रांमध्ये रुग्णालयपूर्व आरोग्य सेवांमधील मानकीकरण, कौशल्य विकास, गुणवत्ता सुधारणा, मूल्यांकन प्रक्रिया आणि क्षमता वृद्धी या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. देशातील रुग्णवाहिका आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेमध्ये गुणवत्ता हमी यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकास, मानकीकरण आणि गुणवत्ता हमी अधिक सक्षम करण्यासाठी ‘बीव्हीजी’ सातत्याने कार्यरत असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे देशातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!