Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

पर्यावरण

अजिंक्यतारा सजतोय मायेच्या ओलाव्याने;

अजिंक्यतारा सजतोय मायेच्या ओलाव्याने;
Ashok Ithape
  • PublishedMay 9, 2026

रणरणत्या उन्हात ‘रानवाटा’च्या जयंत देशपांडे, रवी पवार व सहकारी यांचा ‘भगीरथ’ प्रयत्न!

भुईंज l प्रतिनिधी : महेंद्रआबा जाधव ​- “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश आपण भिंतीवर वाचतो किंवा भाषणांत ऐकतो. मात्र, सातारा शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक ‘अजिंक्यतारा’ किल्ल्यावर हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरताना दिसत आहे. रणरणत्या उन्हाचे चटके सोसत असताना, जिथे माणसाला सावलीची ओढ लागते, अशा काळात अजिंक्यतारा किल्ल्यावरील कोवळ्या रोपांना जगवण्यासाठी काही ‘निसर्गवेडे’ हात सरसावले आहेत.

समाजसेवक श्री. जयंत देशपांडे, नगरसेवक श्री. रवी पवार आणि त्यांचे सर्व सहकारी सध्या एका पवित्र कार्यात मग्न आहेत. केवळ फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण करून न थांबता, लावलेली ही झाडे या कडाक्याच्या उन्हात जगली पाहिजेत, यासाठी ही टीम दररोज नित्यनेमाने किल्ल्यावर जात आहे.

वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा संपत असताना, ही रोपे जगवणे मोठे आव्हान असते. मात्र, जयंत देशपांडे आणि रवी पवार यांनी हे आव्हान पेलले आहे. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून, दररोज सकाळी किल्यावर जाऊन प्रत्येक झाडाला पाणी घालण्याचे काम हे कार्यकर्ते करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे ‘रानवाटा’ आणि पर्यावरण संरक्षणाची ही चळवळ आता खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनत आहे.

आजच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. “झाडे जगवा, जीवन सुरक्षित करा” हा केवळ नारा न राहता ते एक कर्तव्य आहे, हेच या कार्यातून दिसून येते. या ग्रुपचे हे कार्य केवळ झाडांना पाणी देण्यापुरते मर्यादित नसून, ते येणाऱ्या पिढीला निसर्गाशी जोडण्याचा एक पूल आहे.

रणरणत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना, जेव्हा हे कार्यकर्ते झाडांना पाणी घालतात, तेव्हा त्यातून मिळणारे समाधान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे असते. अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि साताऱ्याच्या निसर्गसौंदर्यात भर घालणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आणि वंदनीय आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!