मराठी संगीत नाटकांची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची सुवर्णगाथा : पंडित जयराम पोतदार
वाई, दि. ७ मे : वाई वसंत व्याख्यानमालेच्या सातव्या पुष्पात “मागोवा संगीत नाटकांचा” या विषयावर ज्येष्ठ संगीत अभ्यासक पंडित जयराम पोतदार यांची सुरेश कृष्णाजी साखवळकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संगीत नाटकांच्या समृद्ध परंपरेचा ऐतिहासिक, सांगीतिक आणि सांस्कृतिक प्रवास रसिकांसमोर उलगडला. तबल्याला ओमकार देगलूरकर यांनी तर हार्मोनियमला संगीत महामहोपाध्याय श्री. शिवदास देगलूरकर यांनी साथ केली.
पंडित जयराम पोतदार यांनी मराठी संगीत नाटकांच्या इतिहासाचा मागोवा घेताना सांगितले, “विष्णुदास भावे यांचे ‘सीता स्वयंवर’ हे ५ नोव्हेंबर १८४३ रोजी रंगभूमीवर आलेले पहिले मराठी संगीत नाटक मानले जाते. मात्र खऱ्या अर्थाने व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत शाकुंतल’पासून झाली. ३१ ऑक्टोबर १८८० रोजी आलेल्या या नाटकाने मराठी रंगभूमीचा चेहरामोहराच बदलून टाकला. तथापि संगीत नाटकांची परंपरा त्याही आधीची आहे. तंजावरचे व्यंकोजी राजे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू होते, त्यांनी दोनशे वर्षांपूर्वीच संगीत नाटके लिहिली होती. शहाजी, व्यंकोजी ते सरफोजीपर्यंतचे तंजावरचे राजे अत्यंत विद्वान होते. संस्कृत, तमिळ, मराठी आणि तेलुगू या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी सुमारे पासष्ट नाटके लिहिली. त्यातील १६९० मध्ये शहाजी राजांनी लिहिलेले ‘सीता कल्याण’ विशेष प्रसिद्ध मानले जाते.
विष्णुदास भावे आणि पुढे अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या माध्यमातून मराठी संगीत नाटकांची परंपरा विकसित झाली. सुरुवातीच्या काळात नाटके मुख्यतः पद्यरूपात असत. गद्य भाग सूत्रधार स्वतः म्हणायचा आणि पात्रे मुखाभिनय करायची. संस्कृत नाटकांचा या परंपरेवर मोठा प्रभाव होता. कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुंतल’ तसेच ‘मृच्छकटिक’ यांसारख्या नाटकांतून प्रेरणा घेऊन पुढे संगीत नाटकांचा प्रवास सुरू झाला. विष्णुदास भावे यांना पटवर्धन राजांनी नाटक लिहिण्यास सांगितले होते. सुरुवातीला त्यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून नाटके सादर केली. १८४३ मध्ये सरकारी मदत मिळाल्यानंतर त्यांचे प्रयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाले. शाहिरी वाङ्मय, लावण्या, पोवाडे यांचाही मराठी संगीत नाटकांवर प्रभाव पडला.
१८७५ मध्ये परशुराम तात्यांचे ‘वेणीसंहार’ आणि ‘नलदमयंती’ ही नाटके आली. पुढे अण्णासाहेब किर्लोस्कर यांना संगीत नाटकाची प्रेरणा कशी मिळाली याविषयी सांगताना त्यांनी नमूद केले की, पुण्यात रेव्हेन्यू खात्यात नोकरी करत असताना एका थिएटरमध्ये भागवत कंपनीचे नाटक सुरू होते; मात्र त्यांना तिथे जागा मिळाली नाही. दुसऱ्या थिएटरमध्ये ते गेले असता तिथे ‘इंद्रसभा’ हे नाटक सुरू होते. त्या नाटकाने ते इतके भारावून गेले की मराठीत अशी नाटके का नसावीत हा विचार त्यांच्या मनात आला. त्याच रात्री त्यांनी ‘शाकुंतल’च्या पहिल्या अंकाचे मराठी भाषांतर लिहून काढले.
‘संगीत शाकुंतल’च्या पहिल्या प्रयोगामध्ये पडद्यामागे नांदी सुरू असतानाच चुकून पडदा उघडला गेला आणि इतिहासात पहिल्यांदाच उघड्या पडद्यावर नांदी सादर झाली. हे नाटक एवढे प्रभावी ठरले की संपूर्ण मराठी रसिकवर्ग अक्षरशः जागा झाला आणि त्यापूर्वीची नाटके इतिहासजमा झाली. भाऊराव कोल्हटकर यांनी साकारलेली शकुंतला ही भूमिका विशेष गाजली. त्यांचे अकाली निधन झाले नसते तर पुढे बालगंधर्व घडले नसते, असे मानले जाते. गोविंद बल्लाळ देवल यांनी ‘शाकुंतल’ची पहिली आवृत्ती लिहिली होती. बालगंधर्वांनी प्रथम नटीची भूमिका केली आणि नंतर काही वर्षांनी शकुंतलेची भूमिकाही साकारली.
अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे दुसरे महत्त्वाचे नाटक म्हणजे १८८२ मध्ये आलेले ‘सौभद्र’. हे नाटक आजही लोकप्रिय आहे. इंग्रजांनी कोहिनूर नेला, पण ‘सौभद्र’ नेता आले नाही, असे म्हटले जाते. बालगंधर्वांची सुभद्रेची भूमिका विशेष गाजली. यातील ‘वद जाऊ कुणाला शरण’ या गाण्याची चाल यमुनाबाई वाईकर यांच्या ‘नेसली पितांबरी जरी ग’ या लावणीवर आधारित होती. किर्लोस्करांचे तिसरे नाटक ‘रामराज्य वियोग’ अपूर्ण राहिले; त्यातील केवळ तीन अंक त्यांनी लिहिले. तरीही त्यांची तिन्ही नाटके प्रचंड गाजली.
बालगंधर्वांच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, लहान वयातच त्यांच्या गायनाची ख्याती झाली होती. ते दहा वर्षांचे असताना लोकमान्य टिळकांसमोर गाण्याचा प्रसंग आला आणि टिळकांच्या तोंडून ‘हे तर बालगंधर्वच’ हे शब्द बाहेर पडले. तेव्हापासून त्यांना ‘बालगंधर्व’ हे नाव मिळाले. त्यांना नटसम्राट म्हटले जात असले तरी वसंतराव देशपांडे यांच्या मते त्यांना ‘गायनसम्राट’ म्हणणे अधिक योग्य ठरेल. किर्लोस्करांनी म्हटले होते की, भाऊराव कोल्हटकर यांच्या निधनाने अस्ताला गेलेले भाग्य बालगंधर्वांच्या आगमनाने पुन्हा उदयाला आले.
काकासाहेब खाडिलकर यांनी बालगंधर्वांना डोळ्यासमोर ठेवून ‘मानापमान’ हे नाटक लिहिले. हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरले. पहिल्याच प्रयोगाला हजारो रुपयांची तिकिटे काही तासांत विकली गेली होती. मात्र त्या दिवशी सकाळी बालगंधर्वांच्या मुलगी हिराचे निधन झाले होते. सर्वांनी प्रयोग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला; पण बालगंधर्वांनी ‘माझ्या वैयक्तिक दुःखामुळे एवढ्या लोकांचा आनंद हिरावून घेण्याचा मला अधिकार नाही’ असे सांगून प्रयोग केला. ‘नाथ हा माझा’ या गाण्याला त्यांनी त्या दिवशी सलग सहा वेळा ‘वन्स मोअर’ घेतला.
मुलीच्या निधनानंतरही रंगभूमीवर इतक्या तन्मयतेने उभा राहणारा तो विलक्षण कलाकार होता. पुढे संगीत नाटकांमध्ये चालींची एक परंपरा निर्माण झाली. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत पूर्वी राजवाड्यांपुरते मर्यादित होते. काकासाहेब खाडिलकर यांनी ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. ‘चंद्रिका ही जणू’ यांसारखी गाणी आधी चाल तयार करून त्यावर लिहिली गेली होती. ‘स्वयंवर’ हे नाटक वैभवासाठी प्रसिद्ध होते. या नाटकासाठी राजवाड्यांतून अस्सल शालू, शेले आणि खरे दागिने मागवले जात. रुक्मिणीची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला खरे दागिने परिधान केले जात. पॅरिसहून अत्तर मागवले जाई आणि त्यासाठी त्या काळात सतराशे रुपयांपर्यंत खर्च होत असे.
गडकरी आणि बालगंधर्व यांच्या नात्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, गडकरी रागावलेले असताना बालगंधर्वांनी त्यांना नाटक लिहिण्याची विनंती केली. त्यावर गडकरी म्हणाले, ‘मी नाटक लिहिले तर तुम्हाला फाटलेल्या लुगड्यात भूमिका करावी लागेल.’ त्यावर बालगंधर्वांनी ‘तुम्ही नाटक लिहिणार असाल तर गोणपाट नेसूनही करेन’ असे उत्तर दिले. त्यानंतर ‘एकच प्याला’ हे नाटक जन्माला आले. दुर्दैवाने गडकरींना त्या नाटकाचा प्रयोग पाहता आला नाही. पुढे आचार्य अत्रे, छोटा गंधर्व आणि अनेक कलाकारांनी मराठी संगीत नाटकांची परंपरा पुढे नेली.”
मुलाखतीदरम्यान ‘नेसली पितांबरी जरी ग’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘फुलवनशेज साबरो’, ‘सृजन कसा चोरी मन’, ‘कत्ल मुझे कर डाला रामा’, सत्य वदे वचनाला नाथा’, ‘पिराई मोरी अखियाँ’ ‘ नाही मी बोलत नाथा’ यांसारखी अनेक अजरामर पदे सादर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. माया अभ्यंकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यांचा डॉ. रूपाली अभ्यंकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ. शरद अभ्यंकर, वर्षा बेडेकर आणि विनीत पोफळे यांचा सत्कार जयराम पोतदार यांचे हस्ते करण्यात आला. वाईकर रसिकांनी प्रचंड उपस्थिती दर्शवली.





















