खगोलशास्त्रीय पुराव्यांतून रामायण-महाभारताचा वैज्ञानिक कालखंड उलगडता येतो : निलेश ओक
![]()
“महाभारत साडेसात हजार, तर रामायण बारा हजार वर्षांपूर्वीचे”; वाई वसंत व्याख्यानमालेत अभ्यासपूर्ण विवेचन
वाई : वाई वसंत व्याख्यानमालेच्या सहाव्या पुष्पात “रामायण महाभारत : वैज्ञानिक काल निर्णय” या विषयावर प्रसिद्ध संशोधक श्री. निलेश ओक यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद शेलार होते. व्याख्यानासाठी वाईकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.
आपल्या व्याख्यानात निलेश ओक यांनी भारतीय इतिहास, खगोलशास्त्र, संस्कृत भाषा आणि वैज्ञानिक पद्धती यांच्या आधारे रामायण व महाभारताचा कालखंड कसा निश्चित करता येतो, याचे सविस्तर विवेचन केले. “भारतीय संस्कृती, वेद, रामायण आणि महाभारत यांच्याबाबत अनेक चुकीच्या समजुती शिक्षण व्यवस्थेत रुजवल्या गेल्या आहेत. मात्र खगोलशास्त्रीय पुरावे आणि वैज्ञानिक अभ्यास यांच्या आधारे या महाकाव्यांचा कालखंड निश्चित करता येतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाभारताच्या कालगणनेविषयीची उत्सुकता १९९४ मध्ये पीएचडीच्या अभ्यासादरम्यान निर्माण झाली आणि जवळपास चौदा वर्षांच्या संशोधनानंतर २००९ मध्ये त्यावरील निष्कर्ष मांडता आले, असे त्यांनी सांगितले. “भारतीयांकडे फक्त ‘हिस्टरी’ नाही, तर ‘इतिहास’ आहे,” असे सांगताना त्यांनी संस्कृतमधील ‘धर्मार्थकाममोक्षाणाम्…’ हा श्लोक उद्धृत करून भारतीय इतिहासाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.
संस्कृत भाषेतील स्थैर्यामुळे हजारो वर्षांपूर्वीचे साहित्य आजही समजू शकते, असे सांगत त्यांनी भारतीय ऋषींनी विकसित केलेल्या कालगणना पद्धतीवर प्रकाश टाकला. उज्जैन हे प्राचीन काळी कालगणनेचे केंद्र होते, तसेच दिवसाची सुरुवात भारतात सकाळी सहा वाजता मानली जात असे, असेही त्यांनी नमूद केले.
महाभारतातील सुमारे ३०० आणि रामायणातील जवळपास ६०० खगोलशास्त्रीय संदर्भांच्या आधारे महाभारत साधारण साडेसात हजार वर्षांपूर्वी, तर राम-रावण युद्ध बारा हजार दोनशे वर्षांपूर्वी घडल्याचा दावा त्यांनी केला. वेदांमधील सरस्वती नदीच्या वर्णनावरून वेदांची निर्मिती किमान २१ हजार वर्षांपूर्वीची असावी, असेही त्यांनी सांगितले.
महाभारतातील ‘अरुंधती-वसिष्ठ’ संदर्भ, भीष्म पितामहांचा उत्तरायणापर्यंतचा काळ, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचे उल्लेख आणि ध्रुवताऱ्याचा अभाव यांसारख्या संदर्भांच्या आधारे महाभारताचा कालखंड निश्चित करता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामायणातील अगस्त तारा, पुष्य नक्षत्र, तसेच लंकेच्या दिशेचे वर्णन यांमधूनही त्या काळातील खगोलशास्त्रीय स्थिती स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
द्वारका समुद्रात बुडाल्याचा उल्लेख, धोलावीरा आणि लोथल येथील बंदरांचे संदर्भ, तसेच समुद्रपातळीत झालेल्या बदलांचे पुरावे यांमधून महाभारतकालीन घटनांना वैज्ञानिक आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय रामायणातील बहुसुळे असलेल्या हत्तींच्या उल्लेखाचा संबंध ‘मॅमथ’ प्रजातीशी जोडत त्यांनी त्या काळातील जीवशास्त्रीय संदर्भही स्पष्ट केले.
रामायण आणि महाभारतात खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र आणि जीवशास्त्र यांचे विलक्षण ज्ञान अंतर्भूत असल्याचे सांगत, “या सर्वांचा खरा अभ्यास करायचा असेल तर मूळ रामायण आणि महाभारत वाचणे तसेच खगोलशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनीत पोफळे यांनी केले. प्रमुख वक्ते निलेश ओक यांचा परिचय सौ. पूजा चौंडे यांनी करून दिला. त्यांचा सत्कार गिरीश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. आभार रामप्रसाद घाटगे यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रायोजक श्री. विलास साळुंखे, श्री. गोविंद कुलकर्णी, डॉ. सौ. गांधारी आणि डॉ. केदार वनारसे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.





















