कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पासाठी वाई पालिकेस ५ कोटींचा निधी
वाई,दि. ३१: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वाई नगर परिषदेच्या साठलेल्या, जुन्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने बायोमायनिंग प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पासाठी ५ कोटी, १ लाख ८७ हजार ५०० इतका निधी मंजूर झाल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी दिली.
वाई पालिकेने जुन्या कचऱ्याची विल्हेवाट
व प्रक्रिया प्रकल्पासाठी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील मंजुरीसाठी वर्षभर सातत्याने पाठपुरावा करत होते.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय सल्लागार व आढावा समितीने स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत ५ कोटी,१ लाख, ८७ हजार ५०० रुपये खर्चाच्या या प्रकल्पास मान्यता दिली. निधीच्या विनियोगास तांत्रिक मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यास वाई नगरपालिकेस कळविण्यात आले आहे, अशी माहिती तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष संजय लोळे यांनी दिली.
या प्रकल्पामुळे शहर व शहरासभोवतीच्या त्रिशंकू भागातील लोकसंख्येच्या कचऱ्याचा व अन्य नागरी सुविधांचा ताण कमी होणार आहे. शिवाय कृष्णा नदी प्रदूषण व पर्यावरणदृष्ट्या हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याने शहरात समाधानाचे वातावरण आहे.













