किसन वीर व खंडाळा कारखान्याचे ऊस बील जमा-प्रमोद शिंदे
वाई – दि. 28 : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर-खंडाळा कारखान्याकडे गाळप हंगाम सन २०२३-२४ करिता गळिताकरिता आलेल्या ऊसाची १६ जानेवारी ते सिझन संपेपर्यंतच्या ऊस बीलाची ३ हजार रूपयांप्रमाणे होणारी रक्कम १८ कोटी ५८ लाख ६७ हजार ४४६ रूपये संबंधित ऊस उत्पादकांच्या नावे जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक रूपयाही बुडणार नसुन जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ३ हजार रूपये देणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा शब्द दिलेला होता. त्यानुसार किसन वीर व खंडाळा कारखान्याची उर्वरित १६ जानेवारी सिझन संपेपर्यंत किसन वीर कारखान्याचे १६ कोटी १२ लाख ५६ हजार ४३८ तर खंडाळा कारखान्याची २ कोटी ४६ लाख ११ हजार ८ रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहेत. किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे गळिताकरिता आलेल्या संपुर्ण ऊस बीलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली असल्यामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. किसन वीर कारखान्याचे ४ लाख ५३ हजार ७५८ मेट्रिक टन गाळप झालेले होते. त्याची होणारी एकुण रक्कम १३६ कोटी १२ लाख ७६ हजार ९७ रूपये व खंडाळा कारखान्याकडे १ लाख ४ हजार ५४५ मेट्रिक टन गाळप झालेले होते त्याची होणारी रक्कम ३१ कोटी ३६ लाख ३७ हजार २३२ रूपये संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे. आजपर्यंत किसन वीर व खंडाळा कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर १६७ कोटी ४९ लाख १३ हजार ३२९ रूपये वर्ग केलेले आहेत. तसेच सिझन २०२०- २१ मधील थकीत राहिलेले शेतकऱ्यांचे ऊस बीलही लवकरच वर्ग करणार असल्याची माहिती देऊन येणारा सिझन २०२४-२५ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याकडेच गळिताकरिता पाठविण्याचे आवाहनही व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केलेले आहे.













