Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

वाईतील गिरीराज हॉटेलमध्ये रंगला अनोखा रक्षाबंधन सोहळा

वाईतील गिरीराज हॉटेलमध्ये रंगला अनोखा रक्षाबंधन सोहळा
Ashok Ithape
  • PublishedAugust 23, 2024

हॉटेलमालकांच्या आपुलकीने परप्रांतीय कर्मचारी भारावले

वाई / प्रतिनिधी : चवदार जेवण व उत्कृष्ट सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील गिरीराज हॉटेलमध्ये राखी पौर्णिमेनिमित्त परप्रांतीय कर्मचाऱ्यांसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करून हॉटेलमालकांनी आपुलकी जपली. मालकांच्या या जिव्हाळ्यामुळे परप्रांतीय कामगार मंडळीही भारावून गेली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाईतील गिरीराज हॉटेल हे उत्कृष्ट व चवदार पदार्थांसाठी सुप्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक येथील पदार्थांच्या प्रेमातच पडतात अशी ख्याती आहे. उत्कृष्ट सेवा आणि चवदार पदार्थांमुळे अनेक ग्राहक या हॉटेलची माऊथ पब्लिसिटी करताना आढळून येतात. व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यात या हॉटेलचे मालक नारायणराव जाधव सुपरिचित आहेत.

नुकत्याच झालेल्या राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त आपल्या हॉटेलमध्ये काम करणारे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी परप्रांतातील कामगार मंडळींसाठी रक्षाबंधन सोहळा आयोजित करून श्री. जाधव यांनी अनोखी आपुलकी जपली. घरगुती वातावरणात हा रक्षाबंधन सोहळा साजरा करून त्यांनी कर्मचाऱ्यांना आनंदाची प्रचिती दिली. हा सोहळा पाहताना कर्मचारी तर भारावलेच, मात्र उपस्थित ग्राहकांनाही समाधान वाटले व त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आपल्या कर्मचाऱ्यांप्रती जिव्हाळा जपणाऱ्या नारायणराव जाधव यांना कामगार मंडळींसह ग्राहक व प्रतिष्ठित मंडळींनीही या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले आहेत.

गिरीराज हॉटेलच्या माध्यमातून व्यवसायाच्या बरोबरीने कर्मचाऱ्यांचे वाढदिवस, दिवाळी, भाऊबीज रक्षाबंधन आदी सण उत्साहात साजरे केले जातात. तसेच सर्वधर्मसमभावाची शिकवण देत विविध सण समारंभाचे येथे पालन करण्यात येते. रक्षाबंधनानिमित्त झालेल्या उपक्रमाबद्दल अनेकांनी हॉटेल गिरीराज व नारायणराव जाधव यांचे कौतुक केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!