अविनाश फरांदेंची पर्यावरण समितीवर निवड व्हावी. पर्यावरण दिनानिमित्त वाई तालुक्यातील वनप्रेमींची मागणी
![]()
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..” या संतवचनाच्या अनुषंगाने सातत्याने वनराई संवर्धनासाठी कार्यरत असणारे ओझर्डे (ता. वाई) येथील सुप्रसिद्ध वनप्रेमी अविनाश फरांदे यांच्या पर्यावरण रक्षणासाठीच्या प्रयत्नांचा सविस्तर वृत्तांत
वाई तालुक्यातील ओझर्डे हे निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झालेले आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्यासह अनेक मान्यवरांची मायभूमी. शेती हा तिथला मूळ व्यवसाय. शेतीत पारंपारिक कृषी उत्पादनांच्या बरोबरीने वेगळे प्रयोग करणारे शेतकरीही ओझर्डेत आहेत. मात्र त्यापेक्षाही पर्यावरण रक्षण आणि वनक्षेत्र वाढीसाठी तन, मन, धनाने राबणारे अविनाश फरांदे हे खऱ्या अर्थाने ओझर्डे पंचक्रोशीचे भूषणच म्हणावे लागेल. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा तो जगला पाहिजे वाचला पाहिजे आणि वाढलाही पाहिजे, मात्र शेती बरोबरच पर्यावरण संवर्धनाची भूमिका घेऊन अविनाश फरांदे यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेती आणि शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली.
आपल्या निवासस्थानास सोनाई हे आपल्या आज्जीचे नाव तर त्यांनी दिलेच. मात्र आपल्या आज्जीच्या नावाने त्यांनी वनक्षेत्रही वसवले. वडिलार्जित चार एकर जमिनीपैकी अडीच एकरात नगदी पिके घेण्याऐवजी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने त्यांनी विविध वृक्षांची लागवड केली व मोठ्या जिद्दीने कष्टाने आणि नियोजनाने त्यांनी वृक्ष संपदेने नटलेली सोनाई बाग निर्माण केली… वाढवली आणि फुलवलीसुद्धा.
सुरुवातीच्या काळात पेरू नारळ लिंबू आदींची लागवड केली वडिलांनी खणलेल्या विहिरीला म्हणावेसे पाणी नसल्याने त्यांनी हंडा, मडके, कळशी आदींच्या माध्यमातून डोक्यावरून वाहून या झाडांना पाणी घातले. याशिवाय पाणी वाया जाऊ नये म्हणून ठिबक सिंचनाचा प्रयोगही त्यांनी राबवला. वनशेतीतून भविष्यकाळात चांगले उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने शेतीमध्ये त्यांनी साग आणि निलगिरीची लागवड केली याशिवाय 110 प्रकारचे विविध अडीच हजार वृक्ष त्यांनी शेतात लावले आहेत. खरे तर एकट्या शेतकऱ्याने एवढे वृक्ष लावण्याचा हा एक वेगळा विक्रमच आहे. याशिवाय औषधी वनस्पती सुद्धा त्यांनी आवर्जून लावल्या आहेत. वनशेतीतील पालापाचोळा एकत्रित करून गोबर गॅसची स्लरी तसेच गोठ्यातील शेणमूत्र एकत्रित करून कंपोस्ट खताचा प्रयोगही त्यांनी राबवला आहे.
अर्थात त्यांचे हे सर्व प्रयोग कमालीचे यशस्वी ठरले आहेत. त्या मागे त्यांची जिद्द आणि पर्यावरण रक्षणासाठीची कळकळ, तळमळ दिसून येते. शेतीचा जोड व्यवसाय म्हणजे दुग्ध पालन अद्यावत गोटा बांधून जनावरांना सांभाळून दुग्ध व्यवसाय ही यशस्वीरित्या ते चालवत आहेत.
स्वतःबरोबरच इतरांचाही विकास व्हावा, म्हणून ओझर्डे परिसरातील अन्य सुमारे 40 शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकरी बचत गट स्थापन करण्यात ही त्यांनी पुढाकार घेतला. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, फायदेशीर पिकांची लागवड करणे व योग्य बाजारपेठेच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी श्री फरांदे यांनी मोलाची भूमिका बजावली. शेतकरी बचत गटाद्वारे धान्य निवडीचे मशीनही खरेदी करण्यात आले असून त्याद्वारे अनेकांना धान्य निवडून देण्याची सुविधा ओझर्डे येथे उपलब्ध झाली आहे.
दरम्यान पद्मावती कृषी विज्ञान मंडळ स्थापन त्याद्वारे कृषी वाचनालय व शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर उपक्रम राबवण्याचाही फरांदे यांनी प्रयत्न केला आहे. मधमाशापालन, कीड नियंत्रण, बीजगुणन, माती तपासणी, तण निवारण, सेंद्रिय शेती, गोठा व्यवस्थापन, पशुसंवर्धन आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींना पाचारण करून शेतकऱ्यांच्या विकासासाठी अविनाश फरांदे सातत्याने प्रयत्न करत असतात. अर्थात त्यासाठी त्यांना विविध मान्यवरांचे, अधिकारी, ग्रामस्थ व मित्रमंडळींसह कुटुंबीयांचेही मोठे सहकार्य मिळत असते.
विविध पिकांचे शेतकरी तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी जिज्ञासू व्यक्ती शेती आणि वनक्षेत्रातील श्री फरांदे यांचे विविध प्रयोग पाहण्यासाठी सातत्याने येत असतात. श्री. फरांदे हेसुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता सहजपणे मार्गदर्शन करत राहतात. गेल्या 42 वर्षांपासून शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रयोग करणाऱ्या अविनाश फरांदे यांना राज्य व केंद्र शासनासह विविध संस्था संघटनांनी पुरस्कारांनी गौरवले आहे. सन 2002 मध्ये महाराष्ट्र सरकारने वनश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. सन 2003 मध्ये केंद्र सरकारने इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे तर त्यांच्या बरोबरीनेच ग्रामपंचायतीलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . सातारा जिल्हा परिषदेने सन 2004 मध्ये डॉ. जगदीशचंद्र बसू ( जे. के. बसू आधुनिक सेंद्रिय शेती पुरस्काराने तर त्याच वर्षी बळीराजा मासिकातर्फे कै. मोहन भिडे स्मृती आदर्श शेतकरी पुरस्काराने श्री. फरांदे यांचा सन्मान करण्यात आला आहे. दरम्यान वाईतील वसुंधरा उत्सव समितीतर्फे वसुंधरा गौरव पुरस्काराने ही सन 2007 मध्ये तर त्याच वर्षी नाशिकच्या पूर्वा केमटेक कंपनीतर्फे प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
पर्यावरण जनजागृती व वननिर्मिती संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या या जिद्दी अवलियास शासनाने समयोचित समितीवर स्थान देऊन त्यांचा यथायोग्य गौरव करणे अपेक्षित आहे. आजवर शेतीशी आणि वन संवर्धनाशी सूतराम संबंध नसलेल्या काही व्यक्तींना अशा समितीवर घेतले जाते मात्र फरांदेंसारख्या तळमळीच्या वन मित्राला अजूनही प्रतीक्षाच करावी लागते, हा दुराभास दूर व्हावा अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांनी आणि वन मित्रांनी केली आहे.
ही होती पर्यावरण संवर्धनासाठी 24*7 कार्यरत राहणाऱ्या अविनाश फरांदे यांच्या कार्याची थोडक्यात ओळख.













