लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या तेराव्या पुष्पात ‘प्रश्न स्त्रियांचे’ या विषयावर मार्गदर्शन
वाई, ता. १४ः गेल्या काही शतकांपासून समाजातील स्त्रियांची परिस्थिती बदलत आहे. अनेक कायद्यांमुळे स्त्रियांना स्वातंत्र्य, मोकळीक, अधिकार मिळत आहेत. मात्र आजही स्त्रियांसमोरील आव्हान आणि प्रश्न कमी झालेले नाहीत. स्त्रियांच्या या प्रश्नांचा विचार केला गेला पाहिजे. असे वक्तव्य प्रसिद्ध समाज कार्यकर्त्या व लेखिका वर्षा काळे यांनी त्यांच्या व्याख्यानाद्वारे केले.
लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या तेराव्या पुष्पात ‘प्रश्न स्त्रियांचे’ या विषयावर त्या मार्गदर्शन करत होत्या. यावेळी श्रीमती संजीवनी कद्दू या अध्यक्षस्थानावर होत्या.
वर्षा काळे म्हणाल्या, “आज स्त्रियांसमोरील प्रश्न काय? असा विचार केला तर आजही आपल्याला स्त्रियांसमोर असलेले नाना विविध प्रश्न, अडचणी दिसून येतात. हुंडाबंदी कायदा, स्त्री शिक्षणाचा, कायदा सती विरोधी कायदा अशा अनेक कायद्यांमुळे स्त्रियांची समाजातील परिस्थिती सुधारत गेली. स्त्री शिक्षणाचा सारा इतिहास आपल्याला परिचित आहे. पण आज ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील स्त्री शिक्षणाची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतला तर लक्षात येते की आजही स्त्री शिक्षण सर्वत्र पोहोचलेले नाही.
उच्च शिक्षण घेऊन, अत्यंत चांगल्या पदावरच्या नोकऱ्या मिळवून , अर्थार्जन करून सुद्धा आजही ‘तुझ्या घरी जा आणि दिल्या घरी सुखी रहा’ ही स्त्रीची परिस्थिती बदललेली नाही. आज ग्रामीण भागामध्ये हुंडा घेऊन मुलींची लग्न करून दिली जातात. समाजात मुलींची संख्या कमी झाल्यामुळे आज हुंडा घेण्याऐवजी देण्याची वेळ समाजावर आली आहे. मात्र हुंडा घेऊन लग्न करताना त्या स्त्रीच्या मताचा विचार केला जातो का? हा निश्चितच स्त्रीमुक्तीचा आविष्कार नाही.
आज स्त्रियांवर लिहिणारे भरपूर लोक आहेत मात्र त्यांच्यासाठी काम करणारे कमी. राजकारणात जर एखादी स्त्री अभ्यासपूर्णरित्या, ठामपणे स्वतःची मते मांडत असेल तर तिला बदनाम करून राजकारणाबाहेर फेकणे हा प्रकार वारंवार होताना दिसतो. स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने सहभाग घेतलेल्या स्त्रिया स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुन्हा घरात बंद झालेल्या दिसतात.
इतर स्त्रियांसाठी दृष्टेपणे काम करणाऱ्या स्त्रीला मागे खेचणारा हा समाज आहे. आज समाजामध्ये स्त्रियांचे स्थान, स्त्रियांची परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली असली तरी आजही आपण स्त्री पूर्णतः मुक्त असलेल्या समाजात आहोत असे म्हणता येणार नाही.”
वर्षा काळे यांनी स्त्रियांसाठी काम करत असताना मुंबईतील रेल्वेसंदर्भात त्यांनी स्त्रियांसाठी केलेले कार्य तसेच बारबलांसाठी कार्य करत असताना त्यांना आलेले अनुभव या साऱ्याचे सूक्ष्म अवलोकन त्यांच्या व्याख्यानाद्वारे केले. श्रीमती संजीवनी कद्दू यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शलाखा मांढरे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिल. पूजा चौंडे यांनी आभार मानले.
डॉ.अर्चना चिंतामणी केळकर (चिंतामणी आय क्लीनिक) डॉ. लता गजेंद्र पाटील (पाटील आर्थो. हॉस्पिटल ) यांनी या व्याख्यानाचे प्रयोजन केले होते. श्रोत्यांनी विशेषतः स्त्रियांनी व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.













