Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

‘किसन वीर’चे ऊस बील जमा १३ कोटी ११ लाख ३८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; प्रमोद शिंदे

‘किसन वीर’चे ऊस बील जमा १३ कोटी ११ लाख ३८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; प्रमोद शिंदे
Ashok Ithape
  • PublishedJanuary 30, 2024

भुईंज, दि. ३० :

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे सन २०२३-२४ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसास प्रतिटन ३ हजार रूपये हप्ता जाहीर करण्यात आलेला असून पहिल्या पंधरवड्याचे बील १३ कोटी ११ लाख ३८ हजार २५६ रूपये संबंधित सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर कारखान्याचा गळित हंगामास सुरूवात ३ नोव्हेंबरला झालेली होती. कारखान्याने यापुर्वीच पहिल्या पंधरवड्याची सेव्हिंग्जची बीले शेतकऱ्यांची खात्यावर वर्ग केलेली होती. आता पहिल्या पंधरवड्यातील उर्वरित सोसायटीची बीलेही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहेत. किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्यांना कोणत्याही बँकेचा वित्तपुरवठा होत नसल्यामुळे पहिल्या पंधरवड्यातील बीलांना विलंब झालेला आहे. यापुढील पंधरवड्याची बीलेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यानच्या काळात काही अपप्रवृत्तींनी कारखान्याविषयी गरळ ओकायला सुरूवात केलेली होती. परंतु कारखान्याचे सुज्ञ सभासद अशा अपप्रवृत्तींना भीक घालणार नाहीत याची खात्री आमच्या व्यवस्थापनास आहे. आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन कायमच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे असणार असल्याची खात्रीही यावेळी त्यांनी देऊन किसन वीर व किसन वीर-खंडाळा हे दोन्ही कारखाने आर्थिक गर्तेतून निश्चितपणे बाहेर काढुन पुन्हा गतवैभव मिळवून देणार असल्याचेही सांगितले.

किसन वीर कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्यात (दि. ३/११/२३ ते १५/११/२३) कारखान्याकडे ४३ हजार ७१२ मेट्रिक टनाचे गाळप झालेले होते. त्यानुसार प्रतिटन ३ हजार रूपयांप्रमाणे होणारी एफआरपीची एकुण रक्कम १३ कोटी ११ लाख ३८ हजार २५६ रूपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपुर्णपणे वर्ग करण्यात आलेली आहे.

कारखाना कार्यक्षेत्रातील सुज्ञ सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांची कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस हा किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा काखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे व संचालक मंडळाने केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!