Tue, Mar 3, 2026
शेतीविषयक बातम्या

सेंद्रीय शेतीविषयी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न, शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सेंद्रीय शेतीविषयी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न, शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Ashok Ithape
  • PublishedNovember 8, 2023

सातारा, दि. 8 : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे. उत्पादित केलेल्या सेंद्रीय मालाला बाजारपेठ मिळवून दिली जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.

चौकीचा आंबा ता. खटाव येथील ज्ञानजनाई मंगल कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. डूडी बोलत होते. यावेळी दहिवडीच्या प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनिचा पोत खराब होत चालला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले वेळोवेळी मातीचे परिक्षण करुन कृषि विभागाच्या सांगण्यानुसार पीक पद्धतीत बदल करवा. सेंद्रीय शेती करत असताना शेतकऱ्यांनी एकाच प्रकारचे पीक घ्यावे. विविध कंपन्यांशी सेंद्रीय उत्पादित माल विकत घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. सेंद्रीय शेती करणाऱ्यांना बाजारपेठही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सेंद्रीय शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. सेंद्रीय शेतीच्या कार्यशाळेचा शुभारंभ माण व खटाव तालुक्यातून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकारी सेंद्रीय शेतीकडे वळावे यासाठी प्रत्येक तालुक्यात कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्यात येणार आहे. शेतीमध्ये सातारा जिल्हा नेहमीच विविध प्रयोग करीत आहे. सेंद्रीय शेतीमध्येही राज्यासह देशात एक आदर्श निर्माण करेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी व्यक्त केला.

यावेळी सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सेंद्रीय शेती कशी करावी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!