Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

साहित्य

कॅमेऱ्यामागील संवेदनशील नजरेतून उलगडली ‘चेहऱ्यांची भाषा’ : सतीश पाकणीकर

कॅमेऱ्यामागील संवेदनशील नजरेतून उलगडली ‘चेहऱ्यांची भाषा’ : सतीश पाकणीकर
Ashok Ithape
  • PublishedMay 19, 2026

वाई, दि.१७ मे : वाई वसंत व्याख्यानमालेच्या सतराव्या पुष्पात “चेहऱ्यांची भाषा” या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार श्री सतीश पाकणीकर यांचे अनुभवसमृद्ध व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुनील शिंदे होते.

आपल्या व्याख्यानात श्री सतीश पाकणीकर यांनी छायाचित्रण कलेचा प्रवास, त्यामागील संवेदनशीलता, तांत्रिक बदल आणि व्यक्तिचित्रणातील अनुभव याविषयी अत्यंत प्रभावी मांडणी केली. “उठल्यापासून झोपेपर्यंत हजारो चेहरे आपल्या डोळ्यांसमोरून जातात. काही आनंदी, काही दुःखी, काही करारी असतात; मात्र दिवस संपताना ते विस्मरणात जातात. पण फोटोग्राफर जेव्हा एखादा फोटो टिपतो तेव्हा तो काळाचा एक तुकडाच जणू जतन करत असतो. तो क्षण पुन्हा अनुभवता येतो.

हजार शब्दांत जो भाव व्यक्त होतो तो एका चित्रात सहज व्यक्त होतो. संगीत आणि चित्रकलेला हजारो वर्षांचा इतिहास असला तरी फोटोग्राफीचा इतिहास अवघा १८२ वर्षांचा आहे. मात्र एवढ्या कमी काळातही या कलेने प्रचंड प्रगती केली. त्यामागे गेल्या पंचवीस वर्षांतील तांत्रिक क्रांती कारणीभूत आहे. आज कंपन्या काही महिन्यांत नवीन कॅमेरे आणतात, तंत्रज्ञान बदलते; मात्र कॅमेऱ्यामागील माणसाच्या भावना कायम चिरंतन राहतात.

फोटोग्राफी हा शब्द ‘फोटोस’ आणि ‘ग्राफी’ या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘फोटोस’ म्हणजे प्रकाश आणि ‘ग्राफी’ म्हणजे चित्र. त्यामुळे फोटोग्राफीला ‘छायाचित्र’ नव्हे तर ‘प्रकाशचित्र’ म्हणणे अधिक योग्य आहे. फोटोग्राफरचे स्वामित्व हक्क जपले गेले पाहिजेत. लेखक आणि प्रकाशकांनी छायाचित्र वापरताना छायाचित्रकाराला योग्य श्रेय देणे आवश्यक आहे.

छायाचित्रण करताना आयुष्यातील अनेक विलक्षण क्षण अनुभवता आले. एका जैन कुटुंबातील वृद्ध व्यक्तीने संथारा स्वीकारल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील प्राणज्योत मावळतानाचा क्षण टिपण्याची संधी मला मिळाली. तो अनुभव आजही अंगावर शहारा आणतो. जपानी लोकांचे किमोनोमधील फोटो, पॅरिसमध्ये एका फ्रेंच जोडप्याचे छायाचित्रण असे विविध अनुभव लाभले. माझ्या पहिल्या प्रदर्शनानंतर पु. ल. देशपांडे यांनी ‘या छायाचित्रांतून स्वर ऐकू येतात’ अशी दिलेली प्रतिक्रिया आजही स्मरणात आहे. माझ्या काढलेल्या तीन छायाचित्रांवर भारतीय टपाल विभागाने टपाल तिकिटे प्रकाशित केली, हे माझे मोठे भाग्य आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी अनेक नामवंत व्यक्तींची छायाचित्रे काढताना आलेले अनुभवही रसिकांसमोर उलगडले. मृणाल कुलकर्णी, अमृता खानविलकर, माधुरी दीक्षित, महाराष्ट्राचे लाडके उद्योगपती शंतनू किर्लोस्कर, डॉक्टर एस चंद्रशेखर. डॉ विजय भटकर , कवी ग्रेस, गुलजार, हृदयनाथ मंगेशकर, अनिल अवचट , अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, आशा भोसले, सुनीता देशपांडे, पु ल देशपांडे, आर के लक्ष्मण, झाकीर हुसेन, सचिन तेंडुलकर, श्रीराम लागू, अली अकबर, भीमसेन, अल्ला खासाब, रविशंकर, शिवकुमार शर्मा यांच्यासोबतचे अनुभव त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार श्री भद्रेश भाटे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. सायली मर्ढेकर यांनी करून दिला. प्रमुख वक्ते व अध्यक्ष यांचा सत्कार संचालक विशाल कानडे यांनी केला.श्री शिवाजीराव देशमुख व डॉ. विनय रामचंद्र लोखंडे हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते. त्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे यांचेहस्ते करण्यात आला. व्याख्यानातून उपस्थितांना छायाचित्रण कलेमागील संवेदनशील दृष्टी आणि मानवी भावविश्वाचा वेध घेण्याची नवी दृष्टी मिळाली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!