कुरकुंभ येथील श्री फिरंगाई देवी देवस्थानाचा ऐतिहासिक ठसा उजेडात; छत्रपती राजाराम महाराजांचे १६९८ मधील आज्ञापत्र सापडले
![]()
मोडी लिपीतील दस्तऐवजातून शिवछत्रपतींच्या काळातील देवस्थान व्यवस्थेचा उलगडा; युद्धकाळात थांबलेले उत्सव पुन्हा सुरू करण्याचे आदेश

सातारा l प्रतिनिधी : मौजे कुरकुंभ (ता. दौंड, जि. पुणे) येथील श्री फिरंगाई शक्ती देवीचे प्राचीन व जागृत देवस्थान इतिहासाच्या नव्या दालनात झळकले आहे. छत्रपती राजाराम महाराज यांचे मोडी लिपीतील अप्रकाशित आज्ञापत्र नुकतेच समोर आले असून, या दस्तऐवजामुळे मराठा कालखंडातील देवस्थान व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पैलू उलगडला आहे.
खरे जंत्रीप्रमाणे २७ ऑगस्ट १६९८ रोजीचे हे आज्ञापत्र असून, ते पुणे येथील पुरालेखागारातून उपलब्ध झाले आहे. मोडी लिपी अभ्यासक व इतिहास संशोधक कांचन कोठावळे (पुणे) यांना हे दस्तऐवज प्राप्त झाले. या आज्ञापत्रात छत्रपती राजाराम महाराजांनी तत्कालीन देशाधिकारी नरहर आपदेव यांना दिलेल्या आदेशांचा उल्लेख आहे.
दस्तऐवजानुसार, देवस्थानाचे तत्कालीन पुजारी कृष्णाजी व सुभानजी भगत यांनी सातारा येथे जाऊन देवस्थान अत्यंत जागृत व महत्त्वाचे असल्याचे निवेदन केले होते. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवळासाठी ध्वज व ध्वज मंडप उभारल्याचा उल्लेख या पत्रात आढळतो. त्यामुळे शिवछत्रपतींच्या काळात या देवस्थानाला विशेष महत्त्व होते, हे स्पष्ट होते.
तसेच, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील युद्धजन्य परिस्थितीमुळे (“धामधुमीचा प्रसंग”) देवस्थानातील पूजा, नैवेद्य व उत्सव विस्कळीत झाल्याचे नमूद आहे. या पार्श्वभूमीवर, पुजाऱ्यांनी छत्रपती राजाराम महाराजांकडे देवस्थानाची व्यवस्था पूर्ववत करण्याची विनंती केली होती.

याविनंतीचा स्वीकार करत छत्रपती राजाराम महाराजांनी देवस्थानासाठी भोग, पूजा, नैवेद्य, नंदादीप, तसेच सेवेकरी लोकांचे वतन सुरू ठेवण्याचे आदेश दिले. यासोबतच नित्य पुराण सांगण्यासाठी पुराणिक, अभिषेकासाठी ब्राह्मण आणि अन्नछत्र चालविण्याचीही नेमणूक करण्याचे निर्देश अष्टप्रधान मंडळातील पंडितराव यांना दिल्याचे या आज्ञापत्रात नमूद आहे.
या ऐतिहासिक दस्तऐवजामुळे कुरकुंभ येथील श्री फिरंगाई देवी देवस्थानाची परंपरा, तसेच मराठा साम्राज्यातील धार्मिक व्यवस्थापनाची पद्धत अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या माध्यमातून अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन व डिजिटलायझेशन सुरू असून, संशोधकांना याचा मोठा फायदा होत आहे. या प्रक्रियेत सहाय्यक संचालक शैला जंगम यांच्या मार्गदर्शनाचे विशेष योगदान लाभले.
तसेच राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभागातील तज्ज्ञ अधिकारी तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, संचालक सुजित कुमार उगले यांचेही मार्गदर्शन या संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.

इतिहासातील रहस्य उलगडणारी संशोधक – कांचन कोठावळे
इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अनेक रहस्ये उलगडण्यासाठी तज्ज्ञ व संशोधक सतत प्रयत्नशील असतात. अशाच संशोधनातून साताऱ्याच्या सुनबाई कांचन कोठावळे यांनी एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दुवा उजेडात आणला आहे.
सातारा येथील शनिवार पेठेतील मूळ रहिवासी असलेल्या कांचन कोठावळे या सध्या पुण्यात वास्तव्यास असून त्या मोडी लिपीच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ तर्फ पाटस येथील श्री फिरंगाई शक्ती देवीच्या प्राचीन मंदिराचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी असल्याचे संशोधनातून स्पष्ट केले आहे.
त्यांच्या हाती लागलेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यानुसार, या देवस्थानासंदर्भात मोडी लिपीत लिहिलेले अप्रकाशित आज्ञापत्र उपलब्ध झाले आहे. हे आज्ञापत्र श्रीमन महाराज, क्षत्रिय कुलवंत छत्रपती राजाराम महाराज यांचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या शोधामुळे केवळ एका देवस्थानाचा इतिहास समोर आला नसून, मराठा साम्राज्याच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेवरही नव्याने प्रकाश पडला आहे.





















