अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १७.०८ कोटींची मदत मंजूर
![]()
मकरंद पाटील यांच्या पुढाकारातून नाशिक-जळगावातील नुकसानग्रस्तांना आधार
सातारा : अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या नाशिक व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकूण रुपये १७ कोटी ८ लाख ९० हजार इतकी मदत मंजूर करण्यात आली असून, या निर्णयामागे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा पुढाकार आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत, विशेषतः नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत मकरंद पाटील यांनी तात्काळ प्रशासनाला सतर्क करत नुकसानग्रस्त भागांचा सखोल आढावा घेण्याचे आदेश दिले.
त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे शासन यंत्रणा वेगाने कार्यरत झाली आणि मदत प्रस्ताव अल्पावधीत मंजूर करण्यात आला. ही मदत शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक सहाय्य नसून, संकटातून सावरण्याची नवी उमेद देणारी ठरत आहे. बियाणे खरेदी, शेती पुनर्बांधणी आणि पुढील हंगामासाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी ही रक्कम महत्त्वाची ठरणार आहे.
मकरंद पाटील यांची भूमिका ही केवळ प्रशासकीय मर्यादेत न राहता मानवी संवेदनशीलतेची जाणीव करून देणारी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून वेळेत निर्णय घेण्याची त्यांची कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या निर्णयामुळे संकटाच्या काळात शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, हा विश्वास शेतकरी वर्गामध्ये अधिक दृढ झाला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासही या मदतीचा मोठा हातभार लागणार आहे.













