Thu, Apr 2, 2026
साहित्य

राजेश स्वामी यांच्या जाण्याने सामाजिक नुकसान : आयएफएस डॉ. विनोद गायकवाड

राजेश स्वामी यांच्या जाण्याने सामाजिक नुकसान : आयएफएस डॉ. विनोद गायकवाड
Ashok Ithape
  • PublishedMarch 19, 2026

भुईंज : आयएफएस राजेश स्वामी यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचे नुकसान झाले नसून ते एक सामाजिक नुकसान आहे. त्यांच्यासारखे जमिनीशी अत्यंत घट्ट नातं असणारे व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणादायी आहे. अत्यंत दर्जेदार अशा अभ्यासिकेच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भारतीय विदेश सेवेतील अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी पाचवड, ता. वाई येथे केले.

राजेश स्वामी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाचवड येथील तिरंगा इंग्लिश स्कूल येथील राजेश अभ्यासिकेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. राजेंद्र गलांडे होते.

सध्या पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आयएफएस डॉ. विनोद गायकवाड पुढे म्हणाले, राजेश स्वामी हे मला सिनियर होते. त्यांचे मार्गदर्शन सुरुवातीच्या काळात मिळाले. सर्वांशी आपुलकीने वागणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. तिरंगाच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा खूप चांगल्या आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्दीने मेहनत करावी.

ॲड. राजेंद्र गलांडे म्हणाले, जेव्हा राजेश स्वामी अधिकारी झाले नव्हते. तेव्हापासून त्यांच्याशी झालेली मैत्री समृद्ध करणारी ठरली. त्यांचे वाचन, व्यासंग थक्क करणारा होता. फार मोठा अधिकारी झाल्यानंतर देखील ही व्यक्ती जुन्या मित्रांना विसरली नाही. गावी आल्यानंतर सातारला येऊन धावती भेट का होईना देणार. मित्रांशी गप्पांचा फड जमावणार. त्यांच्या स्मृती जपणे आवश्यक होते. ते काम जयवंत पवार आणि तिरंगा स्कूलने कर्तव्य भावनेने केले आहे.

यावेळी पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल रोहणराज ज्योतिकांत भोसले यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.पै. जयवंत पवार, पै. मधुकर शिंदे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास प्राचार्य आर. एस. पाटील, ॲड. सुयोग बाबर, ज्योतिकांत भोसले, जयवंत पिसाळ, सदाशिव स्वामी, कुमुदिनी स्वामी, संजीवनी स्वामी, मिलिंद स्वामी, सतीश जंगम, पद्मा जंगम, हेमंत बाबर, तुषार जंगम, निलेश डोंबे आदी उपस्थित होते. प्राचार्या वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, अभ्यासिकेच्या व्यवस्थापिका शिल्पा पवार यांनी स्वागत केले.
विजया पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!