महावितरणच्या दुजाभावामुळे भुईंजमधील शेतकरी संतप्त
![]()
दिवसा वीज न मिळाल्यास डाॅ. सुरभी भोसलेंचा रास्ता रोकोचा इशारा.
पाचवड l प्रतिनिधी : भुईंज परिसरातील वीज पुरवठ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून विस्कळीत आणि अपुऱ्या वीज पुरवठ्याचा त्रास येथील शेतकरी सहन करत आहेत. वारंवार विनंत्या करूनही महावितरणकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने, आता भुईंजमधील समस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून थेट रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महावितरणमार्फत भुईंज गावच्या परिसरात शेतीसाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन टप्प्यात वीज पुरवठा केला जातो. मात्र, ही वेळ शेतकऱ्यांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वाई तालुक्यातील इतर गावांना अखंडित वीज पुरवठा केला जात असताना, केवळ भुईंजवरच हा अन्याय का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकरी या अन्यायाचा सामना करत आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतात जावे लागते, ज्यामुळे धोका आणि शारीरिक कष्ट वाढले आहेत. हा त्रास इतराना नाही. त्यामुळे इतर गावांना एक न्याय आणि भुईंजला दुसरा का? असा प्रश्न निर्माण होऊन शेतकऱ्यांमध्ये महावितरणविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
याबाबत पंचायत समिती सदस्या डाँ. सुरभी भोसले, सरपंच विजय वेळे,चेअरमन मदन शिंदे, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव,प्रगतशील शेतकरी प्रभाकर भोसले यांच्या उपस्थितीत ग्रामस्थानी निवेदन दिले असून त्यामधे, भुईंज परिसराला इतर गावांप्रमाणे संपूर्ण दिवस वीज पुरवठा मिळावा.
विजेच्या वेळापत्रकातील दुजाभाव तातडीने बंद करावा.
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून जर प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही तर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वाई शाखा अभियंत्यांना दिला आहे.
फोटो ओळी :महावितरण अभियंता यांना निवेदन देताना डाँ सुरभी भोसले, सरपंच विजय वेळे, मदन शिंदे व ग्रामस्थ













