Sat, Apr 4, 2026
सातारा जिल्हा

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रीती संगमावरील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रीती संगमावरील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन
Ashok Ithape
  • PublishedMarch 12, 2026

पुष्पांजली अर्पण करून कृतज्ञतापूर्वक आदरांजली; ‘चव्हाण यांच्या विचारांवरच पुढील कार्य’

कराड, दि. १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावरील त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करून स्वर्गीय चव्हाण यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ हे नेहमीच प्रेरणा व शक्ती देणारे स्थान राहिले आहे. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार हे या ठिकाणी नियमित भेट देत असत. त्यांच्यासाठी हे श्रद्धास्थान आणि शक्तिस्थान होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच त्यांनी कार्य केले असल्याचे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर २ फेब्रुवारी रोजीही येथे येऊन अभिवादन केले होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा अभिवादन करण्यासाठी आले असून, पुढील काळातही त्यांच्या विचारांवर प्रेरित होऊन राज्याच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली’ या विशेष कार्यक्रमालाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. या कार्यक्रमातून स्व. चव्हाण यांच्या विचारांना व कार्याला संगीताच्या माध्यमातून उजाळा देत भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!