वाईत पारदर्शक कारभार की कागदोपत्री स्वच्छता?
![]()
वाईतील ब्राह्मणशाहीत गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
वाई | प्रतिनिधी
वाई शहरात नुकतीच पार पडलेली नगराध्यक्ष निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची ठरली. नव्या नेतृत्वाकडून स्वच्छता व सुशासनाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र समोर येत आहे. ब्राह्मणशाही परिसरात ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक व गुलाबराव खामकर पथ या मार्गावर गटारे तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.
अनेक दिवसांपासून गटारांची प्रत्यक्ष साफसफाई न झाल्याने ही अवस्था निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी गटारे साफ केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात ही साफसफाई केवळ कागदोपत्रीच झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गटारांमध्ये वाळूचे ढीग, प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा साचल्याने नाले पूर्णपणे चोकअप झाले आहेत. परिणामी दोन–तीन दिवसांतून गटाराचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहत aje.
या सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. किसनवीर कॉलेज रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत असून शहरातील अनेक भागांत “रस्त्यात गटार की गटारात रस्ता?” अशीच स्थिती असल्याची चर्चा आहे.
नवीन नगराध्यक्षांकडून “पारदर्शक कारभार”ाचा दावा केला जात असला, तरी केवळ ऑनलाईन बैठका घेऊन शहर स्वच्छ होणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रत्यक्ष कामापेक्षा अहवालांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीकाही होत आहे. काही ठिकाणी नळ कनेक्शनसाठी रस्ते खोदून मातीचे ढीग तसेच ठेवले जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
ब्राह्मणशाही परिसरातील नागरिकांनी “अच्छे दिन”च्या अपेक्षेने मत दिले असले, तरी आजही त्यांना दुर्गंधी, सांडपाणी व कचऱ्याचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने गटारांची प्रत्यक्ष साफसफाई, नियमित देखरेख आणि जबाबदारी निश्चित करून ठोस कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संताप तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाईकरांना आता आश्वासन नव्हे, तर ठोस कृती हवी आहे.





















