जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची एनडीएला भेट
![]()
समग्र शिक्षा अभियानांतर्गत अभ्यास दौऱ्यातून इतिहास, विज्ञान व उच्च शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव
सातारा : समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आविष्कार प्राथमिक व माध्यमिक अभियान उपक्रमातून सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी १ व २ मार्च २०२६ रोजी राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना National Defence Academy (एनडीए) या तिन्ही सैन्यदलांसाठी अधिकारी घडविणाऱ्या जगप्रसिद्ध संस्थेला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळाली.
एनडीएला भेट देण्याची परवानगी मिळविणे अवघड असतानाही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी स्वतः पाठपुरावा करून ही परवानगी मिळविली. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण व्हावी व भविष्यात अधिकारी घडावेत, हा या प्रयत्नामागील उद्देश होता. एनडीएतील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी व प्रयोगाधारित शिक्षणाची अनुभूती मिळावी, यासाठी Pimpri Chinchwad Science Centre येथे भेट देण्यात आली. येथे अवकाश विज्ञान, ऊर्जा, ध्वनी, प्रकाश व तंत्रज्ञानाशी संबंधित विविध शैक्षणिक मॉडेल्स व प्रत्यक्ष प्रयोग पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विज्ञान केंद्रातील तारांगण व विज्ञान पार्क विशेष आकर्षण ठरले; यामुळे विद्यार्थ्यांची विज्ञान विषयावरील उत्सुकता अधिक वाढल्याचे दिसून आले.
इतिहासाची प्रत्यक्ष ओळख व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी Lal Mahal येथे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून घेतला. तसेच नाना फडणवीस वाड्यास भेट देऊन पेशवेकालीन वास्तुकला, प्रशासनातील योगदान व त्या काळातील सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीचे सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. पुढे पुण्यातील ऐतिहासिक Shaniwar Wada येथे वाड्याची रचना, दिल्ली दरवाजा, तटबंदी, कारंजे, विहीर आदी बाबींची माहिती गाईडमार्फत देण्यात आली.
उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी यासाठी Government College of Engineering Pune व MIT World Peace University येथेही विद्यार्थ्यांची भेट आयोजित करण्यात आली. या भेटींमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या अभ्यास दौऱ्याचे नियोजन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा व माननीय शिक्षणाधिकारी नायकवडी यांनी केले होते. सहल यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून सहलीचे फलित जाणून घेतले व समाधान व्यक्त केले. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली असून इतिहास, विज्ञान व राष्ट्रसेवेची प्रेरणा त्यांच्या मनात दृढ झाली आहे.













