Wed, Mar 4, 2026
क्राईम न्यूज

भुईंज परिसरात घरफोड्यांचा धुमाकूळ; वाडी-वस्त्यांवर चोरीचे सत्र, नागरिक भयभीत

भुईंज परिसरात घरफोड्यांचा धुमाकूळ; वाडी-वस्त्यांवर चोरीचे सत्र, नागरिक भयभीत
Ashok Ithape
  • PublishedMarch 4, 2026

भुईंज प्रतिनिधी : भुईंज परिसरातील वाडी-वस्त्यांवर गेल्या महिनाभरापासून घरफोड्यांच्या घटना वाढत असून चोरांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा रेकी करून रात्री घरफोड्या केल्या जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दि. १ मार्च २०२६ रोजी पहाटे चारच्या सुमारास वारागडेवाडी, ता. वाई येथील शेतकरी दीपक सूर्यकांत शिंगटे (वय ४५) यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाजाचा आतील कोंयडा कटावटीने काढून प्रवेश केला. बेडरूममधील पोटमाळ्यावर ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीतून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी दीपक शिंगटे यांनी भुईंज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या वाढत्या घटनांमुळे अनेक गावांत नागरिकांनी रात्रगस्त, जागरण सुरू केले आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार चोरट्यांकडे तलवार, गुप्ती, लोखंडी गज यांसारखी हत्यारे असल्याची भीती असून स्प्रे मारून बेशुद्ध करून चोरी केल्याच्या अफवांमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

घटना घडताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. डॉग स्क्वॉडच्या मदतीने चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न झाला; मात्र अद्याप ठोस सुगावा लागलेला नाही. पुढील तपास पोलीस फौजदार तोडरमल व अंमलदार गाढवे करीत आहेत.

पोलीसांचे आवाहन – 

  • सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
    कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा चोरी झाल्यास तात्काळ ११२ वर संपर्क साधावा.
  • अफवांवर विश्वास न ठेवता थेट पोलिसांशी संपर्क साधावा.
    पोलीस पाटील व गावकरी रात्री दक्ष राहावेत.
    गावात आलेल्या अनोळखी व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास त्वरित माहिती द्यावी.
  • पोलीस सतर्क असून नागरिकांनीही सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!