Wed, Feb 25, 2026
सातारा जिल्हा

शिवजयंती दिनी सातारा झाला शिवमय

शिवजयंती दिनी सातारा झाला शिवमय
Ashok Ithape
  • PublishedFebruary 19, 2026

जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेत 12 हजारांहून अधिक सहभागी

• टाळ मृदुंग, लेझीम, ढोल, ताशांनी वाढविली रंगत
• मर्दानी खेळ, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखा ठरल्या आकर्षण
• जय शिवाजी जय भवानीच्या गजराने आसमंत दुमदुमला

सातारा दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या जयंतीचे औचित्य साधून जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा टाळ मृदुंगाच्या गजरात, पोवाडे, लेझीम, ढोल, ताशे, घोडे, छत्रपती शिवाजी आणि मावळे यांच्या वेशातील विद्यार्थी, वासुदेव, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यांच्या साथीने आज सातारा नगरीत उत्साहात आणि शिवमय वातावरणात संपन्न झाली. रांगोळ्यांनी तसेच ठिक-ठिकाणी उभारण्यात आलेल्या कमानी, रंगीबेरंगी पताका, विद्युत रोषणाई यांनी सजलेल्या राजपथावरुन 12 हजारांहून अधिक शिवभक्त-शिवप्रेमी सहभागी झाले. गांधी मैदान येथून मार्गस्थ झालेल्या या मेगा पदयात्रेची सांगता शिवतिर्थ पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पोलीस बॅन्ड पथकाच्या मानवंदनेने झाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन व पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, माय भारत युवा कार्यक्रमाचे राज्य निदेशक कालीदास घाटवळ, माय भारतचे क्षेत्रीय अधिकारी अजय शिंदे, जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व हजारोंच्या संख्येने विविध शाळेंचे विद्यार्थी व शिवप्रेमी नागरिक उत्सुर्तपणे सहभागी झाले होते.

जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रे निमित्त सातारा शहर झाले शिवमय
माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभर जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या मेगा पदयात्रेचा मुख्य कार्यक्रम सातारा येथे भव्यदिव्य संपन्न झाला. या पदयात्रेनिमित्त सातारा शहर शिवमय झाले. सातारा शहरात ठिक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. चौका चौकात शिवकालीन खेळांचे प्रदर्शन करण्यात आले हे खेळ उपस्थितांचे आकर्षण ठरले. तसेच या पदयात्रेत पोवाडे, लेझीम पथक, झांजपथक, सांस्कृतिक कार्यक्रम, घोडेस्वार, वासुदेव, पोतराज, मावळ्यांच्या वेशात मुले, नागरिक, सामाजिक संस्था, असे 12 हजारांहून अधिक शिवप्रेमीनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या, माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या जयंती निमित्त संपूर्ण देशभारत जय भारत मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पदयात्रेचा प्रमुख कार्यक्रम सातारा नगरीत संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुण मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत स्वराज्याचे स्वप्न साकारले. त्यांचे विचार केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्शव्रत आहेत. त्यांचे कार्य पुन्हा एकदा तरुण पिढीपर्यंत नेण्याचे कार्य माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्याअंतर्गत होत असलेल्या जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेच्या माध्यमातून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून माय भारतची सुरुवात झालेली आहे. देशभरातून सव्वा दोन कोटीहून अधिक तरुण जोडलेले आहे. महापुरुषांचा आदर्श घेत तरुण पिढीने नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणत देश पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे प्रेरणास्थान व दैवत आहे. त्यांच्या कार्यातून ऊर्जा घेऊन आपणही देश विकासाचा कार्यक्रम पुढे नेवुया. तरुणांनी आपले विचार, नवनवीन संकल्पना माय भारतच्या पोर्टलवरुन मांडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ देशातच नव्हे तर सातासमुद्रापार नेण्याचे काम होत आहे. मराठ्यांच्या राजधानीत सातारा शाहुनगरीत जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेचा कार्यक्रम होत आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हावासीय उत्साहाने सहभागी झाली आहेत. सामान्य रयतेचे राज्य कसे असते याचे आदर्श उदाहरण घालून देणारे छत्रपती शिवराय. जगभरात शिवाजी महाराजांची विचारांची प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी कामे होत आहेत. केंद्र आणि राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांवर काम करीत आहेत. हिंदवी स्वराज्याचे विचार, रयतेचे विचार, लोकाभिमुख निर्णय छत्रपती शिवाजी महाजांच्या प्रेरणातून हे काम होत आहे. आजची मेगा पदयात्रा याचाच एक भाग आहे. यातून छत्रपती शिवाजी महाजांच्या कतृत्वाचा, पराक्रमाचा जागर शिवभूमी सातारा या ठिकाणी होत आहे. यातून तरुणांना त्यांची देशाप्रती, समाजाप्रती असणारी जबाबदारी लक्षात यावी. देश प्रेमाची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्वापूर्ण आहे. शिवछत्रपतींच्या भूमीत हा कार्यक्रम होत आहे याचा संपूर्ण सातारा जिल्हावासियांना अभिमान असल्याचेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने तसेच तमाम शिवप्रेमींच्या दृष्टीने हा एक अत्यंत पवित्र आणि एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. हिंदवी स्वराज्याची स्थापना, स्वधर्म, स्वराष्ट्र, राष्ट्र प्रेमाचे व राष्ट्र भक्तीचे शिक्षण यांचा आदर्श वस्तुपाठ महाराजांचे चारित्र्य आपल्याला घालून देते. त्यांच्या मार्गानेच देश पुढे गेला पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून माय इंडियाचा जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा कार्यक्रम सातारामध्ये होतोय. राज्याचा हा प्रमुख कार्यक्रम आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुण मावळे घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशातील युवाशक्ती मजबूत करण्याचं काम करीत आहेत. यवुकांमध्ये देशाप्रती निष्ठा, देश प्रेम निर्माण करण्याचे कार्य या मेगा पदयात्रेच्या माध्यमातून होत असल्याचेही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये ‘युवा शक्ती करेगी भारत का निर्माण’ ही चित्रफीत दाखविण्यात आली. पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा घोषणा व विविध देखाव्याद्वारे स्वराज्याच्या स्मृती जागवत अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिवगर्जनेने उपस्थितांमध्ये चैतन्य फुलविले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!