Sat, Sep 5, 2026
साहित्य

वाईतील प्रा. संभाजी लावंड यांच्या ‘सहज संवाद’चे साताऱ्यात एक मार्च रोजी प्रकाशन

वाईतील प्रा. संभाजी लावंड यांच्या ‘सहज संवाद’चे साताऱ्यात एक मार्च रोजी प्रकाशन
Ashok Ithape
  • PublishedFebruary 17, 2026

वाई / प्रतिनिधी : वाई येथील सहजयोगी प्रा. संभाजी लावंड यांनी प. पू. श्री निर्मलादेवी माताजींच्या सहजयोगाचा सुक्ष्म अभ्यास करुन लिहिलेल्या सहज संवाद या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार, दि. एक मार्च रोजी सकाळी ११ वाजता सातारा येथील मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळीचे विलास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारी या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून २७ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी काॅलेज, सातारा येथील बॅ. पी. जी. पाटील सभागृह (हाॅल नं.१४) या ठिकाणी आयोजित केला आहे. या वेळी डॉ. शिवाजी शिंदे (सहायक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर ), सुमन गजानन देसाई (उपसंघटक ,उबाठा शिवसेना मिरा भाईंदर मुंबई), सुंदर दास फंड (ज्येष्ठ साहित्यिक), दीपक पवार (प्रसिद्ध कवी) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कवी सरकार इंगळी करणार आहेत. सदरहू पुस्तकात सहज चैतन्यमय 41 ललित लेख असून वाचकांना व सहजयोगी साधकांना चैतन्याची अनुभूती देणारे आहेत. सदर पुस्तक साताऱ्यातील नामवंत अशा शब्दप्रभू पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले आहे.

संबंधित पुस्तकाचे लेखक प्रा. संभाजी लावंड हे खातगुण ता. खटाव येथील मूळ रहिवासी असून मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांच्या ‘गुराखी’ व ‘वलाफोक’ या ग्रामीण कथासंग्रहांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी कथा, कविता, कादंबरी, नाटक, प्रवासं वर्णने, चरित्र, गझल आदी साहित्य प्रकाराचे लेखन केले आहे. निर्मला देवी माताजींच्या सहजयोगावर त्यांनी लिहिलेले नियोजित दुसरे पुस्तक “श्री सहजचैतन्य जागर” प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!