Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

साहित्य

महाराष्ट्रातील गड किल्ल्याच्या संरक्षणाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतिमूल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी वाढली आहे; विकास खारगे.

महाराष्ट्रातील गड किल्ल्याच्या संरक्षणाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतिमूल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी वाढली आहे; विकास खारगे.
Ashok Ithape
  • PublishedMay 10, 2026

वाई, ता.९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील १२ गड किल्ल्यांना युनेस्कोचे मानांकन मिळाल्याने त्यांची जागतिक वारसा स्थळ अशी नोंद झाली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय वाढून रोजगार निर्मिती होईल यात शंका नाही. मात्र या गड किल्ल्याच्या संरक्षणाबरोबरच छत्रपतीच्या नीतिमूल्यांची जपवणूक करण्याची आपल्या सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी येथे केले.

लो.टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेत श्री. खारगे यांची ” युनेस्कोचा गड सर करताना ” या विषयावर डॉ.रुपाली अभ्यंकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून श्री.खारगे यांच्या जीवन कार्याचा प्रवास उलगडला. श्री. खारगे यांनी आपला जन्म इचलकरंजी येथे सामान्य कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण पालिका शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण कोल्हापूरला तर पुण्यातील शासकीय इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पदवी शिक्षण घेतले.

आपल्यावर आई – वडील, मोठी भावंडे, शिक्षक यांचे संवेदशील संस्कार असून आजवरच्या प्रवासात तीच प्रेरणास्थान ठरले आहेत असे सांगितले. तरुणांनी नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत असा संदेश देताना ते म्हणाले, इचलकरंजी कॉलेजमध्ये लेक्चरर असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो.

१९९४ मध्ये आय. ए. एस. झाल्यानंतर सुरवातीला चंद्रपूर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, यवतमाळ व संभाजीनगर मध्ये जिल्हाधिकारी, पुण्यात उपायुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या चार मुख्यमंत्र्यांच्या काळात मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ससेक्स युनिव्हर्सिटी (यूके) व हावर्ड मध्ये उच्च शिक्षण कोर्स पूर्ण केले. त्याचवेळी सांस्कृतिक विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावेळी छत्रपतींची वाघ नख ही लंडन मधून आणण्यात यश मिळाले. त्यानंतर युनेस्कोसाठी काम करण्याची संधी मिळाली.

छत्रपतींच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद करण्यासाठी युनोस्कोच्या निकषांमध्ये प्रस्ताव सादर केला. हे गड – किल्ले महाराष्ट्राच्या आणि देशाच्या स्वराज्याचे, इतिहासाचे व संस्कृतीचे प्रतीक असून किल्ल्यांची रचना, त्याची वैशिष्ट्ये, स्थापत्य, छत्रपतींची युद्ध नीती, इंटेलिजन्स कलेक्शन याचा आर्कियोलोजी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून आवश्यक सर्व पुरावे सादर केले. त्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. हा खडतर प्रवास करून छत्रपती शिवरायांचे गड किल्ले जागतिक स्तरावर पोहचले आहेत. यापूर्वी जागतिक वारसा स्थळांमध्ये अजिंठा – वेरूळ, एलिफंटा लेणी, सी.एस. टी रेल्वे स्टेशन, पश्चिम घाटात कास पठार यांचा समावेश आहे. आता आपले काम सुरू झाले असून त्याचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे.

तीन वर्षात सर्व पर्यटकांना सोयी सुविधा घ्याव्यात, किल्ल्यांची दुरुस्ती करावी, किल्ल्याचे स्वच्छता, पावित्र्य राखले पाहिजे. अशी अपेक्षा असून त्याचा दहा वर्षाचा अहवाल सादर करायचा आहे. त्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय व परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल. हे पर्यटक छत्रपती पराक्रमाची व किल्ल्यांची माहिती घेतील. त्यातून स्थानिक गाईड व बचतगट यांना काम मिळून रोजगार निर्मिती वाढेल. हे काम करण्यासाठी विविध संघटना व शिवभक्तांनी पुढे आले पाहिजे. छत्रपतींचे कार्य केवळ स्वराज्य आणि गड किल्ले असे मर्यादित नव्हते तर त्याचे युद्धनीती, मराठी भाषा, प्रशासन, शेती विषय धोरण यासाठीचे योगदान मोलाचे आहे. त्यांची ही वेगळी मूल्ये जपण्याचे काम तुम्हा आम्हाला करावे लागणार आहे.

भारत तरुणांचा देश असून विकसित स्कील इंडिया मध्ये तरुणांनी योगदान दिले पाहिजे असेही ते म्हणाले. अभिजित क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. विद्या साळी यांनी परिचय करून दिला. डॉ. चिंतामणी केळकर यांनी सत्कार केला. डॉ.नितीन कदम
व डॉ.अर्चना केळकर प्रायोजक होते. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार अतुल मर्ढेकर, भाऊसाहेब जगदाळे यांच्यासह महसूल कर्मचारी व वाईकर श्रोते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील लोहगड, रायगड, साल्हेर, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग,
खांदेरी व तामिळनाडूतील जिंजी या १२ गडांना युनेस्कोचे मानांकन मिळाले असून त्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली आहे.

छायाचित्र ओळी : वाई वसंत व्याख्यानमालेत विकास खारगे यांचा सत्कार करताना डॉ.चिंतामणी केळकर, त्यावेळी तनुजा इनामदार, दत्ता मर्ढेकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, भद्रेश भाटे, अनिल जोशी, अमित वाडकर.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!