पाचगणी येथील विद्यानिकेतन हायस्कूलची उज्वल यशपरंपरा कायम!
![]()
दहावीचा शंभर टक्के निकाल; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी
पाचगणी | प्रतिनिधी : विद्यानिकेतन हायस्कूल, पाचगणी या नामांकित शैक्षणिक संस्थेने मागील एकतीस वर्षांपासून जपलेली उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम राखत इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि संस्कारक्षम वातावरणामुळे शाळेने पाचगणी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सन १९९५ मध्ये स्थापन झालेली ही शाळा आज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध असून शिस्त, संस्कार आणि आधुनिक शिक्षणपद्धतीचा प्रभावी संगम येथे पाहायला मिळतो. निसर्गरम्य पाचगणी शहरात वसलेल्या या शाळेने पालक आणि विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
शाळेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश बिरामणे, संचालिका सौ. स्वाती बिरामणे तसेच आनंदीता बिरामणे आणि अथर्व बिरामणे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे शाळा सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. विशेषतः सौ. स्वाती बिरामणे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासावर विशेष भर देत असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची त्यांची कार्यपद्धती पालकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.
शाळेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत Asia Today Research Media संस्थेकडून “सर्वोत्कृष्ट निवासी शाळा पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या विशेष योगदानाबद्दल राज्यस्तरीय “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा” हा मानाचाही पुरस्कार शाळेला प्राप्त झाला आहे.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत शाळेतील सहा विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून १४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. तसेच चार विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे अथक परिश्रम, नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश बिरामणे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश शिक्षकांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे फलित आहे. भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उत्तम संस्कार देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण बिरामणे परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





















