Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

देश विदेश

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ;

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ;
Ashok Ithape
  • PublishedApril 27, 2026

एक कोटी हस्तलिखितांचे दस्तऐवजीकरणाचे उद्दिष्ट

सातारा दि. 27 : भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरेला नवी दिशा देणारी महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू झाली आहे. भारत सरकार च्या संस्कृती मंत्रालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) प्रकल्पाच्या माध्यमातून देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून औपचारिक प्रारंभ झाला आहे.

भारतातील हस्तलिखितांचा वारसा अत्यंत विशाल असून, पारंपरिक ज्ञान पिढ्यान्पिढ्या या हस्तलिखितांद्वारे जतन आणि प्रसारित होत आले आहे. मात्र, ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेली असल्याने त्यांचे एकत्रीकरण, संवर्धन आणि व्यापक उपलब्धता ही मोठी गरज बनली होती. याच पार्श्वभूमीवर ज्ञानभारतम् प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश देशभरातील मौल्यवान हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करणे हा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातून एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत एक राष्ट्रीय डिजिटल संग्रह (National Digital Repository) तयार करण्यात येणार असून, तो राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधक आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था किंवा व्यक्तीकडेच राहणार असून, इच्छुकांनी स्वखुशीने ती शासनाकडे सुपूर्द केल्यास ती स्वीकारली जाणार आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख संस्था आणि भूमिका

महाराष्ट्रात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विविध नामांकित संस्था कार्यरत राहणार आहेत:

कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ – क्लस्टर केंद्र

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था – क्लस्टर केंद्र

आनंद आश्रम संस्थान – स्वतंत्र केंद्र

भारत इतिहास संशोधक मंडळ – स्वतंत्र केंद्र

राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले कार्य पाहणार असून, सहनोडल अधिकारी म्हणून अंजली ढमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तंत्रज्ञानाचा वापर

या मोहिमेसाठी “Gyan Bharatam” हे विशेष मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरण प्रक्रिया सुलभ होणार आहे.

प्रशासन आणि समाजाचा सहभाग

या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नेमण्याचे आणि समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मंदिरे, मठ, ग्रंथालये, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि खाजगी संग्राहक यांना सहभागी करून घेण्यावर भर दिला आहे.

यामध्ये NCC, NSS स्वयंसेवक, विद्यार्थी, संशोधक आणि वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.

जनतेसाठी आवाहन

या राष्ट्रीय उपक्रमाच्या निमित्ताने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्या कडे उपलब्ध असलेली हस्तलिखिते “Gyan Bharatam” अॅपवर नोंदवून या ज्ञानसंवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे.

ही मोहीम केवळ हस्तलिखितांचे जतन करण्यापुरती मर्यादित नसून, भारताच्या ज्ञानपरंपरेला डिजिटल युगात नवी ओळख देण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

0000

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!