उद्घाटक म्हणून आशा भोसले यांनी वाढवली साहित्य संमेलनाची उंची
![]()
महाबळेश्वर येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; सुरेल भाषणातून साहित्य-संगीताचा संगम
सातारा : महाबळेश्वर येथे ९ ते ११ जानेवारी २००९ दरम्यान पार पडलेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते झाले होते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि सुरेल शैलीत केलेल्या भाषणामुळे या संमेलनाला एक वेगळी उंची प्राप्त झाली होती.
‘कवींनी माझे गाणे, तर लेखकांनी माझ्या आयुष्याचे पुस्तक लिहावे,’ अशी मनोगत व्यक्त करत त्यांनी साहित्य आणि संगीत यांचा सुंदर संगम साधला. सुमारे साठ वर्षांच्या गायकीचा प्रवास त्यांनी या भाषणातून उलगडत, साहित्याने आपल्या आयुष्याला कशी दिशा दिली हे प्रभावीपणे मांडले.
हे संमेलन आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर वारकऱ्यांनी घातलेल्या बहिष्कारामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते. तरीही संमेलनातील कवी कट्टे, चर्चासत्रे आणि विविध साहित्यिक उपक्रम उत्साहात पार पडले.
आशा भोसले यांनी आपल्या भाषणात साने गुरुजी, रणजीत देसाई, शांता शेळके, सुरेश भट यांसारख्या साहित्यिकांचा आदरपूर्वक उल्लेख करत त्यांच्या साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘मी कविता वाचायला गेले नाही, त्या माझ्याकडे आल्या,’ असे सांगत त्यांनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला. लिखित भाषण असूनही वाचनाऐवजी त्यांनी स्वाभाविक शैलीत संवाद साधत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या संमेलनात महाबळेश्वरच्या साहित्यनगरीला ‘कै. बा. सी. मर्ढेकर कविनगर’ असे नाव देण्यात आले. आपल्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी कोल्हापूर, खानदेश, गोवा यांचा उल्लेख केला तसेच सातारा जिल्ह्याशी असलेले नातेही सांगितले.
“आयुष्यात कर्तव्य श्रेष्ठ आहे, आत्मसन्मान हवा पण अहंकार नको,” असा जीवनमूल्यांचा संदेशही त्यांनी दिला. मराठी साहित्यामुळेच आपण समृद्ध झालो असल्याचे सांगत त्यांनी लेखकांचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित केले.
या संमेलनास तात्कालीन मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, आनंद परांजपे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, मोहन कुलकर्णी, पतंगराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते. आशाताईंच्या प्रभावी भाषणामुळे साहित्यिक आणि श्रोत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
फोटो ओळी : महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना आशा भोसले; यावेळी व्यासपीठावर रामराजे नाईक निंबाळकर, आनंद परांजपे, कौतिकराव ठाले-पाटील, मोहन कुलकर्णी, पतंगराव कदम आदी मान्यवर उपस्थित.













