Sun, Sep 6, 2026
अध्यात्म

देगाव येथे ११० वर्षाची परंपरा कायम, गावकऱ्यांच्या एकीचे दर्शन

देगाव येथे ११० वर्षाची परंपरा कायम, गावकऱ्यांच्या एकीचे दर्शन
Ashok Ithape
  • PublishedAugust 8, 2025

संत तुकाराम महाराज अखंड हरिनाम सप्ताह भंडारा उत्साहात संपन्न

देगाव : ‘तुका म्हणे मायबाप अवघे देवाचे स्वरूप’ या जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या वचनानुसार, देगाव (ता. वाई) येथे जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज अखंड हरिनाम सप्ताह भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायासाठी पंढरीची वारी आणि एकादशीचे जे महत्त्व आहे, तेच महत्त्व तुकाराम महाराजांच्या भंडारा उत्सवाला देखील आहे. या वर्षीही गावकऱ्यांच्या एकीचे दर्शन घडवत, ही ११० वर्षांची अखंड परंपरा मोठ्या दिमाखात पार पडली.गावाचे दैवत असलेल्या हनुमान मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात श्रावणी सप्तमीपासून सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह आठ दिवस चालला. नारळी पौर्णिमेच्या दिवशी या सोहळ्याची सांगता झाली. विशेष म्हणजे, या सप्ताहाला १११ वर्षांची अखंड परंपरा लाभली आहे.

आजच्या आधुनिक युगातही गावातील युवा पिढीने ही परंपरा मोठ्या निष्ठेने जपली आहे. या सप्ताहानिमित्त हनुमान मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिर परिसराची रंगरंगोटी करण्यात आली होती, तसेच आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता.

भंडारा उत्सवाची ऐतिहासिक पार्श्वभूमी:

पूर्वीच्या काळी समाधानकारक पर्जन्यमान होत नसल्याने शेती व्यवसाय मोठ्या संकटात सापडला होता. ‘ईडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो’ या उदात्त हेतूने देगाव गावचे नागरिक गणपत जेधे आणि देगाव ग्रामस्थांनी गावात समाधानकारक पाऊस झाल्यास देगाव गावामध्ये भंडारा घालण्याचा नवस केला होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन भंडारा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत गावात मोठ्या प्रमाणात भंडारा उत्सव साजरा केला जात आहे. ही परंपरा गावाच्या एकजुटीचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनली आहे.

लोकसहभागातून उत्सवाचे स्वरूप:

या उत्सवासाठी गावामध्ये घरटी लोकसहभागातून ग्रामस्थ गहू, तांदूळ, गूळ, तेल, खोबरे यांसारख्या लागणाऱ्या सर्व वस्तू गोळा करतात. या सामूहिक प्रयत्नातूनच भंडारा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवासाठी लापशी आणि जुन्या काळातील पीक असलेल्या काळ्या घेवड्याची उसळ मोठ्या प्रमाणात संपूर्ण गावासाठी बनवली जाते. कालांतराने या उत्सवाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. श्रावण सप्तमीपासून श्री जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज सप्ताह सुरू होतो.

हनुमान मंदिरात संत तुकाराम महाराजांचा विना अखंड उभा केला जातो. विना घेण्याचा मान गावातील प्रत्येक वाड्यात एक दिवस दिला जातो, ज्यामुळे संपूर्ण गावाचा सहभाग सुनिश्चित होतो. हा उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नसून, तो देगाव गावाच्या एकोप्याचे, परंपरेचे आणि सामूहिक श्रद्धेचे एक सुंदर उदाहरण आहे. नव्या पिढीने ही परंपरा पुढे नेल्याने गावाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!