उत्कर्ष कबड्डी संघ सलग दुसर्यांदा भैरवनाथ केसरी
![]()
जांब येथील स्पर्धेत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
भुईंज : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेने क्रीडा विकासाच्या चळवळीत अमूल्य असे योगदान दिले आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक मापदंड निर्माण करणार्या या प्रक्रियेत उत्कर्षच्या कबड्डी संघाने जांब येथे झालेल्या भैरवनाथ केसरी कबड्डी स्पर्धेत सलग दुसर्या वर्षी विजेतेपद मिळवून भैरवनाथ केसरी किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून उत्कर्षच्या खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीने क्रीडा रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले आहे.
उत्कर्ष संस्थेचे संचालक तथा वाई जिमखान्याचे सचिव अमर कोल्हापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई जिमखान्याच्या माध्यमातून क्रीडा विकासात मोलाचे योगदान दिले जात आहे. वाई जिमखान्याचे अनेक खेळाडू मल्लखांब, शरीरसौष्ठव स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर दिमाखदार यश मिळवत आहेत. उत्कर्षच्या खेळाडूंनी आता कबड्डी खेळातही आपला दरारा निर्माण केला आहे. जांब येेथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत गेल्या वर्षी उत्कर्षच्या संघाने विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदाही या संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. सर्व क्रीडा प्रेक्षनांच्या अपेक्षेला उतरत या संघाने यंदाही विजेतेपद पटकावत भैरवनाथ केसरीचा किताब स्वत:कडे राखण्यात यश मिळवले आहे.
या यशाबद्दल उत्कर्ष पतसंस्थेच्या चेअरपर्सन श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, व्हा. चेअरमन अॅड. रमेश यादव, संचालक अमर कोल्हापुरे, मदन साळवेकर, डॉ. मंगला अहिवळे, श्रीकांत शिंदे, शरद चव्हाण, सलीमभाई बागवान, संजय वाईकर, सागर विलास मुळे, वैभव फुले, भूषण तारु, श्रीमती नीला कुलकर्णी, श्रीमती अलका घाडगे, मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी संघ प्रशिक्षक कुणाल तांबोळी व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.





















