व्याहळी कॉलनी गावच्या भाग्यश्री (प्राची) थोरवे हिचे एमपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 या परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षा आणि मुलाखत यानंतर अंतिम उमेदवारांच्या नावाची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली .
या परीक्षेत वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील व्याहळी कॉलनी गावातील कु.भाग्यश्री (प्राची )विजय थोरवे हिने उज्वल यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद मिळवले . वाईच्या पश्चिम भागातील पहिलीच पीएसआय होण्याचा मान सुद्धा तिने मिळवला.
भाग्यश्री हिने आपले प्राथमिक शिक्षण मूळ गाव व्याहळी कॉलनी येथे तर माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल वाई , उच्च माध्यमिक शिक्षण किसनवीर महाविद्यालय वाई येथे तर पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ येथे प्रतिकूल परिस्थिती मध्ये पूर्ण केले. आपल्याला अधिकारी बनायचं आहे हा मनामध्ये संकल्प ठेवून लॉकडाऊन नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास सातारा येथे जाऊन सुरू केला.
थोरवे घराण्याला शोभेल अशी
महत्त्वकांक्षी वाटचाल जगत आणि तिथेच मनाशी एक ध्येय बाळगून तेजोमय स्वप्नातल्या गोष्टी सत्यात उतरवण्याची आस तिला लागली आणि ती इच्छा तिला यशस्वी शिखरापर्यंत पोहचवू शकली.वेळ, काळ आणि स्वत:मधील
कर्तबगारी सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे हे तिने समजून घेतले आणि स्वतःबरोबर आई, वडिलांचे व घरचे नाव मोठे केले.तिच्या कुटुंबातील तिचा मोठा भाऊ महेश (हिम्मत ) हा नुकताच एप्रिल महिण्यामध्ये PSI झाला तर छोटा भाऊ राज हा भारतीय सैन्य दलात रुजू झाला आहे तर एक भाऊ स्पर्धा परीक्षेचा पुण्यामध्ये अभ्यास करत आहे.
भाग्यश्री ने सन 2022 मध्ये पीएसआय पदाकरता लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पहिलीच परीक्षा दिली होती. गुरुवारी एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेमध्ये भाग्यश्री नावाचा तारा लख्ख प्रकाशाने चमकून निघाला असून पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच फौजदार पदी तिची निवड झाली . तिच्या या खडतर प्रवासात शिक्षक,आई -वडील ,संपूर्ण कुटुंब, नातेवाईक व मित्रमंडळी भक्कमपणे तिच्या पाठीशी उभे राहिले. अपयश आले तरी न डगमगता जिद्द,चिकाटी,मेहनत, सातत्य व प्रामाणिकपणा याच्या जोरावर भाग्यश्री ने यश संपादन केले. तिच्या यशाची बातमी समजताच व्याहळी कॉलनी, एकसर व बावधन ग्रामस्थ तिचे संपूर्ण कुटुंब व नातेवाईक यांनी आनंद उत्सव साजरा केला.या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.













