Fri, Apr 17, 2026
साहित्य

सिनेमा समजुन द्यायचा असेल तर भाषा आणि शास्त्र शिकायलाच हवे – चित्रपट समीक्षक अशोक राणे

सिनेमा समजुन द्यायचा असेल तर भाषा आणि शास्त्र शिकायलाच हवे – चित्रपट समीक्षक अशोक राणे
Ashok Ithape
  • PublishedMay 7, 2024

लोकमान्य टिळक संस्था आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या सहाव्या पुष्पात ‘सिनेमा कसा पाहावा’ या विषयावर चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी मार्गदर्शन केले.

वाई, ता. ७ : सिनेमा म्हणजे प्रतिमा, सिनेमा म्हणजे ध्वनी. सिनेमा पाहणं, तो समजून घेणं, तो अनुभवणं हे एक शास्त्र आहे. सिनेमा हा कलेच्या भाषेत असतो, तो समजून घ्यायचा असेल तर ही भाषा आणि हे शास्त्र शिकायलाच हवं. असे मनोगत प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, अभ्यासक आणि संशोधक अशोक राणे यांनी आपल्या व्याख्याना द्वारे प्रकट केले.

लोकमान्य टिळक संस्था आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या सहाव्या पुष्पात ‘सिनेमा कसा पाहावा’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. आदित्य चौंडे यांनी प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी लेखक व दिग्दर्शक श्री. तेजपाल वाघ अध्यक्षपदी होते.

अशोक राणे म्हणाले, “हिंदी सिनेमांमुळे भारतात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत साऱ्यांना हिंदी भाषा अवगत झाली मात्र सिनेमाची खरी भाषा आजही आपल्याला अवगत नाही. सिनेमा सर्वांगाने पहावा लागतो. मात्र स्वतःच्या आवडी पलीकडे जाऊन आज सिनेमा बघितला जात नाही. साधं नाटक पाहायचं झालं तरी प्रकाश दामले सारखे मोठे नट असतील तरच ते पाहायचं. ही मनस्थिती बदलली पाहिजे. नव्या कलाकारांची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

90 च्या दशकापासून सिनेमा बदलायला सुरुवात झाली. नट-नटी आणि खलनायक म्हणजे सिनेमा नव्हे. सिनेमा पाहताना केवळ प्रमुख अभिनेत्यावरती साऱ्यांचे लक्ष केंद्रित असते. मात्र सिनेमा मोठा होण्यासाठी महत्त्वाचे असते ते त्यातील संवाद, व्यक्तिरेखा, आणि मुख्य कथानक. अगदी वेशभूषा, केशभूषा, कॅमेरावर्क ते एडिटिंग पर्यंत साऱ्याचा प्रभाव सिनेमावर पडत असतो आणि या साऱ्यामुळे सिनेमाचा प्रभाव आपल्यावर पडतो. सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती लेखक आणि दिग्दर्शक यांची. एखादा अत्यंत भावनिक सिनेमा बघताना त्याचे पार्श्व संगीत काढून टाकले तर त्या सिनेमाची रय जाईल.”

दर्शनी दिसणाऱ्या प्रमुख अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याखेरीज चित्रपटाच्या यशात खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या अनेकांची नोंद घेतली जात नाही याची खंत अशोक राणे यांनी व्यक्त केली. ‘द कप’ या ऑस्ट्रेलियन सिनेमातील अध्यात्मिकता, ‘स्वदेश’ या सिनेमातील परिवर्तनवाद, ‘किडनॅप’ या इटालियन सिनेमातील संवेदनात्मकता, ‘मसान’ या सिनेमातून दाखवलेली जातीव्यवस्था अशा कितीतरी चित्रपटांचे व त्यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण अशोक राणे यांनी केले.

श्री. तेजपाल वाघ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. श्री चंद्रशेखर ढवण यांनी आभार मानले. हे व्याख्यान कै. ॲड अशोक भट यांच्या स्मृत्यर्थ श्री. श्रीराम अशोक भट यांनी प्रायोजित केले होते.

व्याख्यानासाठी श्रोतेजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!