जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक संपन्न जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा
सातारा, दि.8: जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
या बैठकीस आरबीआयचे व्यवस्थापक विजय कोरडे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, महाराष्ट्र बँकेचे उपअंचल प्रबंधक मिलींद होळ, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, सातारा जिल्ह्याला वित्त आराखडा दिला आहे. या आराखडा जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका राहिली आहे. या आराखड्यानुसार कृषी, उद्योग यासह विविध संस्थांना वित्त पुरवठा करावा. रब्बी हंगामातील पीक कर्जासाठी दिलेले बँक शाखानिहाय उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करावे.
आरसेटी मार्फत प्रशिक्षण दिलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षणानंतर उद्योग उभारणीसाठी बँकांनी वित्त पुरवठा करावा. बांबू लागवड ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून बांबू पासून अनेक वस्तू तयार करता येतात. वस्तू बनविण्याची प्रशिक्षण सत्रे विविध गावांमध्ये सुरु करावीत, अशाही सूचना त्यांनी केल्या.
केरळ राज्याच्या धर्तीवर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटकांसाठी होम स्टेची सुविधा तयार करण्यात येणार आहे. कांदाटी खोऱ्यातील नागरिकांशी संपर्क साधून या विषयी प्रशिक्षणही देण्यात यावे, असेही ते म्हणाले.
बचत गटाच्या माध्यमातून महिला विविध उत्पादनांची निर्मिती करुन आर्थिक प्रगती साधत आहेत. बँकांनी दिलेल्या कर्जाचे नेटके नियोजन करण्यासह कर्जाचा हप्ता देखील भरत आहेत. हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त बचत गटांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले.
बँकांकडे प्रलंबित असलेल्या विविध महामंडळांकडील वित्तीय लाभाच्या प्रकरणांचा 15 दिवसात निपटारा करावा. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे प्रस्तावही जिल्हा उपनिबंध कार्यालयात तातडीने जमा करावीत. तसेच प्रत्येक बँक शाखेत एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्याने शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत दर आठवड्याला आढावा घ्यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले.













